Join us

दुष्काळग्रस्त तीन तालुक्यात मिळणार अनुदान; कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागविल्या याद्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:24 PM

३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील धारुर, वडवणी व अंबाजोगाई तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी केली जाणार आहे.मागच्या खरीप हंगामातील दुष्काळी अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार आहे.

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने २ हेक्टर मयदितील व २ ते ३ हेक्टर मयदितील बाधित क्षेत्र स्वतंत्ररीत्या दर्शविणे गरजेचे आहे. त्यामुळे आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव शेतकरी संख्येसह सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार धारुर, वडवणी व अंबाजोगाईच्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कृषी विभागास शेतक-यांच्या याद्या सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केली आहे.

धारूर, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यांना मिळतेय सूट

शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी उपाययोजना दुष्काळग्रस्त तालुक्यात करण्यात आलेल्या आहेत. रोजगार हमीच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह ८ वेगवेगळ्या सवलती लागू केल्या गेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता एनडीआरएफ दराच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला, २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टर केली, गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसानभरपाई मिळाली त्यापेक्षा अधिकच मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार धारुर, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे सूट मिळत आहे.

टॅग्स :दुष्काळशेतकरीबीड