सुनील चरपे
अंबिया बहाराचा हंगाम संपला असून, निर्यात मंदावल्याने व दर कोसळल्याने संत्रा उत्पादकांचे किमान ६९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. राज्य सरकारने ५० टक्के म्हणजेच १६९.९० कोटी रुपयांच्या संत्रा निर्यात सबसिडीला १८ जानेवारी रोजी प्रशासकीय मंजुरी दिली. ही सबसिडी कोणत्या बहाराच्या संत्रा निर्यातीसाठी आहे, हे मात्र सरकारने स्पष्ट न केल्याने या सबसिडीचा लाभ कुणाला होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
बांगलादेश नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. सन २०१९ पर्यंत बांगलादेशात रोज २०० ट्रक म्हणजेच चार हजार टन संत्रा निर्यात व्हायचा. बांगलादेश सरकारने संत्र्यावर ८८ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क लावल्याने यावर्षी अंबिया बहाराच्या संत्र्याची निर्यात १०० टनांवर आली आहे. ही निर्यात पूर्वीप्रमाणे सुरू असती तर संत्र्याला सरासरी ३० हजार रुपये प्रतिटन दर मिळाला असता. निर्यात मंदावल्याने शेतकऱ्यांना १२ ते १५ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला. संत्रा निर्यात हंगाम सरासरी दाेन महिन्यांचा असतो. यावर्षी निर्यात मंदावल्याने दर कोसळले आणि संत्रा उत्पादकांचे किमान ६९० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
मृग बहाराच्या संत्रा निर्यातीसाठी सबसिडी गरजेची
राज्य सरकारने १८ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला ५० टक्के सबसिडी देण्याची घोषणा करीत १६९.६० कोटी रुपयांची तरतूद केली. सरकारने या निधीला १८ जानेवारी २०२४ राेजी प्रशासकीय मंजुरी दिली व संत्रा निर्यातदारांकडून प्रस्ताव मागितले. परंतु, ही सबसिडी संपलेल्या अंबिया बहाराच्या संत्रा निर्यातीची आहे की, आगामी मृग बहाराच्या संत्रा निर्यातीसाठी आहे, हे सरकारने स्पष्ट केले नाही. ही सबसिडी अंबिया बहारासाठी असल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांकडून कमी दरात संत्रा खरेदी करणाऱ्या व काेणतेही आर्थिक नुकसान न झालेल्या संत्रा निर्यातदारांनाच होणार आहे. परिणामी, ही सबसिडी संपलेल्या अंबिया बहाराऐवजी आगामी मृग बहाराच्या संत्रा निर्यातीसाठी देणे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे ठरेल.
निर्यात वाढविण्यासाठी वाजवी दरात संत्रा मिळावा
बांगलादेशातील मंदावलेली नागपुरी संत्र्याची निर्यात वाढविण्यासाठी तेथील ग्राहकांना वाजवी दरात संत्रा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सरासरी ३० रुपये प्रतिकिलाे दराने संत्रा विकल्यास तो बांगलादेशात जाईपर्यंत १६१ रुपये प्रतिकिलो होतो. ५० टक्के निर्यात सबसिडी वजा करता हा दर ११७ रुपये प्रतिकिलो म्हणजेच १५५ टक्का होता. तेथील ग्राहकांना ८० ते १२० टका म्हणजेच ६१ ते ९१ रुपये प्रतिकिलो संत्रा हवा आहे. या दृष्टीने निर्यात सबसिडीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
आधी निर्यात, नंतर सबसिडी
नागपुरी संत्रा निर्यातीसाठी राज्य सरकारने नोडल एजन्सी म्हणून अपेडाऐवजी पणन संचालनालयाची नियुक्ती केली आहे. निर्यातदारांना ही सबसिडी संत्रा निर्यात केल्यानंतर दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना आधी बांगलादेशचे आयात शुल्क भरावे लागणार असल्याने ते चढ्या दराने संत्रा खरेदी करतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ही निर्यात अपेडाच्या माध्यमातून केल्यास अधिक फायदेशीर ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.