चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ६ रुपये ८७ पैसे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामुळे सी हेवी इथेनॉलला आता ४९ रुपये ४१ पैशांऐवजी प्रति लिटर ५६ रुपये २८ पैसे इतका दर मिळेल. ही दरवाढ सुमारे १४ टक्के आहे. इथेनॉल निर्मितीवर निबंध आणल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला हा थोडाफार दिलासा आहे.
चालू गळीत हंगामात उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होऊन देशात साखरेचे दर वाढण्याची भीती होती. यामुळे केंद्र सरकारने उसाच्या रसापासून तसेच बी हेवीपासून इथेनॉल निर्मितीवर निबंध आणले होते. यामुळे साखर उद्योग तसेच इथेनॉल उत्पादक डिस्टिलरीज बंद पडण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी साखर उत्पादक राज्यांकडून तसेच साखर उद्योगातून केंद्र सरकारकडे दबाव आल्यानंतर केंद्राने हे निबंध काहीसे शिथिल करुन इथेनॉल उत्पादनास परवानगी दिली आहे. मात्र, सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर कोणतेही निबंध नव्हते.
अधिक वाचा: देशात एकूण १३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती
सी हेवी इथेनॉलमुळे साखरेच्या उत्पादनावरही कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे याच उत्पादनाला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान तेल कंपन्यांना २०२३-२४ मध्ये पुरवठा केलेल्या इथेनॉलवर मिळणार आहे.
मोलॅसिस निर्यातीवर ५० टक्के कर?
सध्या सी हेवी मोलॅसिसचा दर प्रति टन १२ हजार रुपयांच्या आसपास आहे. देशात तो मुबलक उपलब्ध असला तरी त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. ही निर्यात कमी होऊन इथेनॉल निर्मितीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा या हेतूने मोलॅसिस निर्यातीवर ५० टक्के निर्यात कर लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आजच्या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. इथेनॉल प्रकल्प असलेले साखर कारखाने आणि डिस्टिलरीज यांना याचा फायदा होईल. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघ
साखर आयात करावी लागू नये तसेच इथेनॉल प्रकल्पांनीही जास्तीत जास्त क्षमतेने उत्पादन घ्यावे यासाठी केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. केंद्र सरकार साखर उद्योगासाठी अनुकूल असल्याचेही या निर्णयातून दिसून आले आहे. - प्रफुल्ल विठलानी अध्यक्ष, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन
सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीचा खर्च प्रति लिटर ६० रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे सी हेवी मोलॅसिसचे सध्याचे बाजारभाव पाहता साखर कारखान्यांना यातून फारसा लाभ होणार नाही. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ