गारगोटी : तालुका कृषी अधिकारी, भुदरगड आणि नाचणी संशोधन प्रकल्प कोल्हापूर यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली भुदरगड तालुक्यातील देवर्डे येथे उन्हाळी नाचणी लागवड प्रयोग यशस्वी केला.
चांगली मागणी, उत्तम भाव, उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर येणारी, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक, अशा वैशिष्ट्यांमुळे आगामी काळात नाचणी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने देवर्डे (ता. भुदरगड) येथे उन्हाळी नाचणी प्रयोग यशस्वी करून दाखविला. नाचणी, शेतकऱ्यांनी भात, ऊस या पिकासोबत नाचणी पिकाचीदेखील लागवड करावी या हेतूने भुदरगड तालुक्यात 'उन्हाळी नाचणी लागवड प्रयोग' करण्यात आला.
देवर्डे येथील प्रदीप कोटकर, नारायण कोटकर, रमेश पंधारे, दिलीप जाधव, गणपती कांबळे, किरण कोटकर या शेतकऱ्यांना एकत्र करून हा प्रयोग राबविला. राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'फुले कासारी' या वाणाची जानेवारी महिन्यात लागवड करण्यात आली. सद्या पीक काढणीच्या अवस्थेत आहे.
नाचणी, वरी या पिकांचे महत्त्व लक्षात घेता या पिकांना मागणी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उन्हाळी नाचणी लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा हा खरीप हंगामात नाचणी पिकविणारा प्रमुख जिल्हा आहे. पण, उन्हाळी हंगामात सिंचनाची सुविधा असलेल्या भागात नाचणी लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. - डॉ. योगेश बन, प्रमुख, नाचणी संशोधन प्रकल्प, कोल्हापूर
अधिक वाचा: Ragi Processing नाचणी पासून कसे कराल पौष्टिक प्रक्रियायुक्त पदार्थ