नारायणगाव : "महिलांनी कृषी मूल्य साखळीतील विविध घटकांमध्ये लक्षणीय योगदान दिले पाहिजे आणि जास्तीत जास्त संस्था आणि महिलांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे, त्याचबरोबर शेतमालाची साठवणूक, प्रतवारी, पॅकिंग, विपणन, प्रक्रिया आणि मूल्य संवर्धन यासारख्या क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे " असे मत प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी वक्त केले. मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत आयोजित भेंडी काढणी पश्चात व्यवस्थापन विषयी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. १८-१९ जुलै दरम्यान सेंटर ऑफ एक्सेलेन्स संस्था कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि किसान कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
अतिरिक्त प्रकल्प संचालक, डॉ. अमोल यादव यांनी मॅग्नेट प्रकल्पामधील विविध घटकांविषयी बोलताना म्हणाले की, नवीन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानास 60 टक्के पर्यंत अनुदान व खेळते भांडवल व मध्य मुदत कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य या योजनेमध्ये मिळते यासाठी शेतकरी उत्पादक संस्थानी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे आवाहन केले. यावेळी डॉ.बी. टी.पाटील (व्हेजीटेबल ब्रीडर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांनी भेंडी चे मूल्य साखळी व्यवस्थापन व कीड व रोग नियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर कष्टकरी राजा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नवनाथ गरुड यांनी काढणी पश्चात हाताळणी व व्यवस्थापन पध्दती तसेच देशांतर्गत विपणन करताना आलेले अनुभव व आठवडी बाजार याबाबत अनुभव सांगितले.
तसेच पुणे येथील प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे विभागीय प्रकल्प अधिकारी अजय कुदळे यांनी व्यवसायातील संधी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विपणन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, आयात निर्यात परवाने व पणन मंडळाच्या योजना याबाबत मार्गदर्शन केले. स्त्री पुरुष समानता व समाज अधिकारी संतोष इंगोले यांनी लिंग समानता व सामाजिक समावेश याबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान किसान कनेक्ट यांच्या कलेक्शन सेंटर ला भेट देऊन तेथील कामकाजाबाबत मनीष मोरे यांनी माहिती दिली. किसान कनेक्ट चे ऑनलाईन ऑर्डर, शेतकरी निवड, जमीन निवड, शेतमाल खरेदी, पॅकिंग, वितरण इ. मुद्द्यांबाबत मनिष मोरे यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमचे सूत्रसंचालन राहुल घाडगे, तर प्रस्तावना सचिन खरमाळे आणि आभार धनेश पडवळ यांनी व्यक्त केले.या निवासी प्रशिक्षणास राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार यांचे 48 प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख राहुल घाडगे, मॅग्नेट प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रकल्प अधिकारी सचिन खरमाळे, प्रकल्प अंबलबजावणी कक्षाचे विभागीय प्रकल्प अधिकारी अजय कुदळे, विषय विशेषज्ञ धनेश पडवळ, संतोष इंगोले, आदित्य माने यावेळी उपस्थित होते.