ग्रामीण भागातील शुगर बेबी म्हणून आरोळी देत विक्रीला येणारी कलिंगडे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. आकारमानानुसार ८० ते २०० रुपये दराने त्यांची विक्री सुरू आहे. सध्या थंडी असूनही कलिंगडे बाजारात विकली जात आहेत. रेवदंडा बाजारात सध्या शुगर बेबी कलिंगडाची आवक वाढली आहे.
साधारण महाशिवरात्रीच्या सुमारास कलिंगडे मोठ्या प्रमाणावर विक्रीला येतात. यंदा मार्च महिन्यात महाशिवरात्र आहे. त्याआधीच कलिंगडे बाजारात दिसत असून त्यांची खरेदीही सुरू आहे.
आकाराने छोटे पण अफाट गोडी
- शुगर बेबी कलिंगडे नेहमीच्या कलिंगडापेक्षा आकाराने लहान असतात. चवीला अफाट गोड असणारी ही कलिंगडे परसबागेतही उगवता येण्यासारखी असल्याचे सांगितले जाते.
- फिकट हिरव्या रंगाची साल आणि त्यावर हिरव्या शिरा अशी दिसणारी ही कलिंगडे पिकवण्यासाठी ७५ दिवस लागतात. इतर कलिंगडांना परिपक्व होण्यासाठी किमान १२० दिवस लागतात.
- शुगर बेबी कलिंगडे ही वाढण्यास सोपी आहेत.त्याच्या लहान आकारामुळे त्यांना पिकनिक कलिंगडेही म्हटले जाते.
हे कलिंगड कसे वाढवतात?
- कलिंगड वाढण्यास लागणारा कालावधी सामान्य कलिंगडापेक्षा कमी असला तरी तसा अधिक आहे.त्यामुळे बियाणे बागेत किंवा शेतात लावण्यापूर्वी घरामध्ये लागवड करण्याची शिफारस केली जाते. या कलिंगडाचे बियाणे हवामानाच्या तीव्र बदलांना संवेदनशील असतात.
- कलिंगडाचे बियाणे उगवायला साधारण १० दिवस लागतात.दोन आठवड्यांनंतर बियाणाला भांड्यात किंवा दुसऱ्या कुंडीत हलवू शकता.
- पाने दिसायला लागल्यानंतर पाणी देणे कमी करण्याची शिफारस केली जाते.
- वेली ढिगाऱ्यात लावल्यावर त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकी 24 इंच ढिगाऱ्यात माती तयार करा. तुम्ही प्रत्येक ढिगाऱ्यात 3 वेली लावू शकता. वेलींना वाढण्यास आणि पसरण्यास पुरेशी जागा मिळावी यासाठी प्रत्येक ढिगाऱ्यामध्ये सुमारे 4 फूट अंतर ठेवा.
- सुरुवातीच्या आठवड्यात झाडाला भरपूर पाणी लागते.जेव्हा फळे पिकतात तेव्हा साखरेची पातळी सुधारण्यासाठी काढणीपूर्वी एक आठवडा त्यांना पाणी देणे थांबवा.