Sugar cane instalment to farmers ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असलेल्या कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेहमीच हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवताना गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी १०० रुपये प्र. मे. टन याप्रमाणे देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
यावर्षी गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढत विक्रमी ८,४५,७३३ मे. टन उसाचे गाळप करून ९,५४,८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे व सरासरी साखर उतारा ११.२९ इतका राहिला आहे. साखर कारखान्याचे दोन टप्प्यांत आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम पूर्ण करून चालू हंगामात यशस्वीरीत्या ऊस गाळप हंगाम पूर्ण केला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे, त्यांना पहिली उचल प्र. मे. टन २ हजार ८२५ रुपये याप्रमाणे यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे.
जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करून पेरणी करता यावी तसेच मुलांच्या शाळा उघडल्याने वह्या, पुस्तके खरेदीसाठी आर्थिक हातभार मिळावा याकरिता ऊस बिलापोटी द्वितीय हप्ता रक्कम १०० रुपये प्र. मे. टन देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आडसाली ऊस लागवड करावी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सर्वसामान्य ऊस उत्पादकांचे हित जोपासणारा कारखाना आहे. एक वेळ कारखान्यात तोटा झाला तरी चालेल, परंतु शेतकरी जगला पाहिजे ही कर्मवीर शंकराव काळे साहेबांची शिकवण व आदर्श विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कारखान्याचे कामकाज करीत आहे. आगामी गळीत हंगाम २०२४-२५ करिता शेतकऱ्यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे. चालू वर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी कराव्यात. -आ. आशुतोष काळे