पुणे : येत्या खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार आहे.
दुसरीकडे ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व इतर देशांमधील ऊस व साखर उत्पादनाची ताजी परिस्थिती लक्षात घेता पुढील दोन वर्षे देशातील साखरेला श्रीलंका, अफगाणिस्तान, पूर्व आशिया, मध्य आखाती देशांमधून चांगली मागणी राहील, असा अंदाज राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे.
दुबई येथे नुकतीच चार दिवस साखर परिषद झाली. यामध्ये जगभरातील शंभर देशांतून तब्बल ९०० प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातर्फे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच इस्मा व खासगी क्षेत्रातील इतर संस्थाचे प्रमुख यात सहभागी झाले होते.
उत्पादनावर सविस्तर चर्चा
या परिषदेमध्ये भारतातील यंदा घटणाऱ्या साखर उत्पादनाबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्याचवेळी १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामाची व त्यातून तयार होणाऱ्या अपेक्षित साखर उत्पादनाचा ऊहापोह करण्यात आला.
यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त
१) महाराष्ट्रातील प्रमुख जलाशयांत उपलब्ध असणारा पाणीसाठा तसेच भारतीय हवामानशास्त्र विभाग व ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाने वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा पाऊसमान समाधानकारक राहणार असून त्याचा अनुकूल परिणाम उभ्या उसाच्या वाढीवर तसेच २०२६-२७ मध्ये नव्या ऊस लागणीवर होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.
२) ही सर्व परिस्थिती तसेच ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व इतर देशांमधील ऊस व साखर उत्पादनाची ताजी परिस्थिती लक्षात घेता २०२५-२६ व २०२६-२७ या दोन वर्षांत भारतीय साखर उद्योगाचा जागतिक साखर बाजारामध्ये दबदबा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून भारताने नव्या हंगामात मोठ्या प्रमाणावर साखर निर्यातीचे नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या काळात भारतातील साखरेला श्रीलंका, अफगाणिस्तान, पूर्व आशिया, मध्य आखाती देशांमधून चांगली मागणी राहण्याचे भाकीत आहे. हे लक्षात घेऊन सर्व कारखान्यांनी आतापासूनच येणाऱ्या साखर उत्पादन वर्षाचे योग्य नियोजन करावे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
अधिक वाचा: Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान