पुणे : राज्यातील उसाचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. येणाऱ्या १५ दिवसांत साखर कारखाने गाळप थांबवण्याची शक्यता असून अनेक साखर कारखाने साखरेबरोबरच उपपदार्थ आणि उत्पादनांची निर्मिती करत असतात. त्यापासून कारखान्यांना जास्तीचा नफा मिळतो. या उत्पादनामध्ये मळी, अल्कोहोल, इथेनॉल, वीज अशा उत्पादनाचा सामावेश असून वीज उत्पादनातून कारखान्यांनी चांगलाच नफा मिळवला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सहवीजनिर्मितीचे धोरण राबवलेले आहे. राज्यातील ६० सहकारी साखर कारखान्यांनी सहवीजनिर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. त्यांची स्थापित क्षमता ही १ हजार २३७ मेगावॅटची आहे. तर ५९ खासगी साखर कारखान्यांकडे सहवीजनिर्मितीचे प्रकल्प असून त्यांची क्षमता ९६५ मेगावॅट इतकी आहे. राज्यात एकूण ११९ साखर कारखान्यांची २ हजार २०३ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे.
साखर कारखान्यांमध्ये निर्माण होणारी वीज ही महावितरणला किंवा वीज मंडळाला विक्री केली जाते. चालू गाळप हंगामामध्ये ४३० कोटी युनिट वीज कारखान्यांकडून विक्री करण्यात आली असून कारखान्यांनी स्वतःसाठी ५३७ कोटी युनिट एवढी वीज वापरली आहे. २०२२-२३ या गाळप हंगामात विक्री केलेल्या विजेतून २ हजार १३५ कोटी रूपयांचा फायदा कारखान्यांना झाला आहे.
या वीजनिर्मितीचा फायदा कारखान्यांना आणि परिणामी शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यासाठी आणि एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी या वीज विक्रीचा फायदा होतो. तर कारखानेसुद्धा वीजनिर्मिती आणि इतर उत्पादनाच्या निर्मितीतून सक्षम झाले असल्याचे चित्र आहे.