शिवाजी पवार
श्रीरामपूर : केंद्र सरकारने मागील हंगामात साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. हंगाम संपेपर्यंत ही बंदी कायम होती.
यंदा मात्र, इथेनॉलला वाढीव दर देत निर्मितीला प्रोत्साहन देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्याचा साखर कारखान्यांना लाभ झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच कारखान्यांमधून उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. बाजारात साखरेच्या पडत्या दराच्या काळात इथेनॉलमुळे कारखान्यांचे अर्थकारण सावरते.
मात्र, गत हंगामात केंद्र सरकारने अचानकपणे धोरणात्मक भूमिका बदलली होती. संपूर्ण हंगामामध्ये इथेनॉल निर्मितीवर बंदी केली होती. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले.
दरवर्षी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वाढविण्याचे धोरण सरकारने जाहीर केले होते. इथेनॉलचे स्वतंत्रपणे पेट्रोलपंप सुरू करण्याची नीती होती. असे असताना भूमिकेत केलेल्या बदलामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
साखर कारखान्यांमधून बी हेवी तसेच सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती केली जाते. प्रत्येक कारखान्यासाठी इथेनॉल निर्मितीचा कोटा निश्चित केला जातो.
इथेनॉलची विक्री केल्यानंतर अवघ्या १४ दिवसांमध्ये त्याचे पैसे कारखान्याच्या खात्यावर वर्ग होतात. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक लाभ होतो.
शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यात मदत होते. साखरेच्या बाजारभावात कोणतीही विशेष वाढ सरकारने केलेली नाही.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांवर
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण जानेवारी अखेर १९.६ टक्के एवढे झाले होते. हे प्रमाण फेब्रुवारी अखेर २० टक्क्यांवर पोहोचले आहे. २००१ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रयत्न सुरू झाले होते.
इथेनॉल निर्मितीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट - ११ कोटी ७३ लाख ६० हजार लिटर
जानेवारी अखेर गाठलेले उद्दिष्ट - ४ कोटी २९ लाख ६२ हजार लिटर
अधिक वाचा: E Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का नाही? हे बघा आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर