रमेश दुरुगकर
औसा : तालुक्यातील साखर कारखान्यांनी Sugar Factory यंदाचा ऊस गळीत हंगाम उशिराने म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू केला असून, बेलकुंडच्या मारुती महाराज सहकारी साखर कारखाना मर्यादित, किल्लारीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना तर गोंद्रीच्या श्री. साई शुगर प्रा. लि. हे तीन साखर कारखाने सुरू झाले आहेत तसेच आशिव येथील माजी आ. दिनकर माने यांच्या गूळपेटी कारखानादेखील चालू झाला आहे.
औसा तालुक्यात ९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली. यंदा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून धरणे, तलाव, विहिरी तुडुंब भरले असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासूनच उसाची लागवड सुरू केली आहे.
पुढील वर्षी उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे तसेच यावर्षी शेतकऱ्यांना अति पावसामुळे नगदी सोयाबीन पीक हाती लागले नाही. शिवाय पिकाची काढणी व बाजारात घसरलेले दर यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनचे पीक काढण्याचा खर्च शेतकऱ्यांना पदरमोड करून करावा लागला. शासनाचा हमीभाव तर शेतकऱ्यांना मिळाला नाहीच हमीभाव खरेदी केंद्राच्या जाचक अटी व उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन मार्केट यार्डत विकले. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ८०० ते १ हजार रुपयांचा फटका बसला.
• मारुती महाराज सहकारी साखर कारखाना
बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून २५ हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. दररोज १ हजार ६०० ते १ हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले जात असून सरासरी साखर उतारा दहा टक्के इतका आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन २ हजार ७०० देण्यात येत असल्याची माहिती चेअरमन श्याम भोसले यांनी दिली.
• साई शुगर्सचे ३५ हजार मेट्रिक टन गाळप
गोंद्री येथील श्री. साई शुगर प्रा. लि. हा साखर कारखाना महिन्यापूर्वीच सुरू झाला असून, दररोज दीड हजार ते सोळाशे मेट्रिक टन उसाचे गाळप केले जात आहे. आजपर्यंत ३५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाला आहे. तर साखर उतारा दहा टक्के आहे.
• किल्लारीत प्रतिदिन १ हजार २०० मे. टन गाळप
किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा १० ते १५ दिवसांपूर्वी हंगाम चालू असून ७ ते ८ हजार मॅट्रिक टन उसाची गाळप झाली आहे. दररोज १ हजार ते १ हजार २०० ते मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येत आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी मागील वर्षी बंद पडलेला किल्लारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मागील वर्षी केवळ ६० ते ६५ हजार टन उसाचे गाळप करून साखर उतारा केवळ ६ ते ७ टक्के इतकाच मिळाला असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने सांगितले.