Pune : राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन २० दिवस उलटले आहेत तरीही अजून राज्यातील गाळप हंगाम संपूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. दरम्यान, साखर आयुक्तालयाकडून अजूनही काही अर्जांची पडताळणी सुरू असून ज्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत अशा कारखान्यांच्या गाळपाच्या परवान्याच्या अर्जाला बाजूला काढले जात आहे. त्यामुळे अत्तापर्यंत राज्यातील साधारण ७० ते ७५ टक्के साखर कारखाने सुरू झालेले आहेत.
दरम्यान, साखर आयुक्तालयाच्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील २०४ साखर कारखान्यांनी गाळपाच्या परवान्यासाठी अर्ज केले होते. त्यातील १४१ साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केलेली आहे. यामध्ये ७१ सहकारी आणि ७० खाजगी साखर कारखान्यांचा सामावेश आहे. तर कालपर्यंत म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत ९७ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.
गाळपाच्या परवान्यासाठी अर्ज केलेल्या कारखान्यांपैकी १८ साखर कारखान्यांचे परवाने अजून प्रलंबित आहेत. तर १० साखर कारखान्यांचे अर्ज परत पाठवण्यात आले आहेत. साखर आयुक्तालयाकडून २७ नोव्हेंबर अखेरपर्यंत १८६ साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने देण्यात आले आहेत. त्यातील ९१ सहकारी आणि ९५ साखर कारखाने खाजगी आहेत.
यंदा राज्यातील गुऱ्हाळघरांची संख्या वाढली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि गाळफ क्षमता जास्त असलेल्या गुऱ्हाळामध्ये गूळ पावडर आणि गुळाचे उत्पादन होते. त्यामुळे साखर कारखान्यांकडे जाणारा ऊस गुऱ्हाळाकडे वळवला जात आहे. यंदा जरी चांगल्या पावसामुळे उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरीही गाळप हंगाम मे महिन्यापर्यंत चालेल की नाही अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोणत्या जिल्ह्यातील किती कारखाने सुरू?
- कोल्हापूर - ३०
- पुणे - २५
- सोलापूर - २५
- अहिल्यानगर - २०
- छत्रपती संभाजीनगर - १५
- नांदेड - २५
- अमरावती - १
- नागपूर - ०
- एकूण - १४१