Join us

Sugar factory: कारखानदार यंदा तरी  शेतकऱ्यांचे भले करणार का; 'एफआरपी' वाढवून मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 2:24 PM

यंदा शेतकऱ्यांना 'एफआरपी' वाढवून मिळणार काय? असा सवाल शेतकरी करत आहेत वाचा सविस्तर (Sugar factory)

Sugar factory : रामेश्वर काकडे / नांदेड : उसाच्या रसापासून तयार होणारी अल्कोहोलनिर्मितीवरील बंदी २०२४-२५ या हंगामासाठी केंद्र सरकारने उठवली आहे. त्यामुळे ऊस कारखान्यांचे उत्पादन वाढून चांगभले होणार आहे; पण यंदा शेतकऱ्यांना 'एफआरपी' वाढवून मिळणार काय? असा सवालही शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर हंगाम सुरू करण्यापूर्वी उसाचे दर जाहीर करावेत, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. ऊसदर आणि उसाची पहिली उचल यांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच मागासलेला आहे.

मागील वर्षात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगला भाव देण्याचा  शब्द दिला; पण प्रत्यक्षात उसाला कमी दर मिळाले. सोबतच वाहतूक व तोड दर यामधील वाढ यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी कमी बसला आहे.  प्रादेशिक सहसंचालकांच्या अंदाजानुसार यावर्षी नांदेड विभागात ३५ लाख मेट्रिक टन उसाची कमी होणार आहे. सोबतच उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसीस यांच्यापासून  अल्कोहोलनिर्मितीवरील बंदी या  हंगामाकरिता केंद्र  सरकारने  उठविली आहे.

त्यामुळे इतर उपपदार्थांचे उत्पादन तुलनेने वाढणार असून साखर कारखान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढेल. त्यामुळे या हंगामात साखर कारखानदारांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव जाहीर करण्याची मागणी होत आहे; परंतु नफ्याचा वाढलेला हिस्सा शेतकऱ्यांना देण्यास साखर कारखानदार तयार नाहीत. मागील वर्षी उसाला कमी मिळालेला दर यामुळे ऊस दर व पहिली उचल यावरून ऊसउत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

एकरकमी ३३०० रुपयांची उचल द्या

चालू गळीत हंगामात तुटलेल्या उसाला एकरकमी ३३०० रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, तीन वर्षांचे 'आरएसएफ'चे हिशेब विशेष लेखापरीक्षक नेमून तपासण्यात यावे व निघालेले 'आरएसएफ'चे पैसे तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावेत.१५ नोव्हेंबरला होणार गाळप हंगाम सुरू

जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्यात येणार आहे. अनेक टोळ्या ऊसतोडणीसाठी सज्ज असून यावर्षी ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर मशीनचे ५० प्रस्ताव शासनाकडे अनुदानासाठी पाठविले आहेत. यासाठी प्रतिहार्वेस्टरला ३५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ऊसतोडणी वेळेत होण्यास मदत होईल, असे साखर सहसंचालक विश्वास देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :शेती क्षेत्रसाखर कारखानेऊसशेतकरीशेतीनांदेड