Join us

Sugar Factory : गाळप हंगाम लांबण्याच्या हालचाली राज्यस्तरावर सुरू! निवडणुकीचा होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 8:00 PM

Sugar Factory : राज्यात निवडणुका लांबल्याने पुढील १० दिवसांत सुरू होणारा गाळप हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

Pune :  राज्यात येणाऱ्या १५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू होणार आहे. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये १५ नोव्हेंबर या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते पण आता राजकारण्यांसमोर निवडणुकांचा पेच निर्माण झाल्याने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लांबवण्याच्या हालचाली राज्यस्तरावर सुरू आहेत.

दरम्यान, राज्यातील बहुतांश साखर कारखाने स्थानिक राजकारण्यांचे आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, परभणी, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात उसतोड कामगार उसतोडीसाठी जात असतात. 

पण या कामगारांचे स्थलांतर झाले तर या मतदारसंघातील मतदानामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता नेत्यांना आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील कारखान्यातील कामगारांनाही मतदानासाठी सुट्टी असणे आवश्यक असल्याच्या कारणाने राजकारणी निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत गाळप हंगाम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून एक ते दोन दिवसांमध्ये गाळप हंगाम १० दिवसांनी म्हणजे २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याच्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. पण यंदा जर कारखाने २५ नोव्हेंबर रोजी सुरू झाले तर गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेरपर्यंत किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप हंगाम चालण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. 

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरी