Sugar Season Starting Date : राज्याच्या गाळप हंगाम सुरू होण्यासाठी आता अधिकृतपणे मुहूर्त ठरला आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली. यामध्ये झालेल्या निर्णयानुसार आता लवकरच साखर कारखान्यांचे बिगुल वाजणार आहे.
दरम्यान, यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्यामुळे उसाचे उत्पादनही वाढणार असल्यामुळे कारखानदार आणि उस उत्पादक आनंदात आहेत. राज्यात अजूनही मान्सूनचा पाऊस सुरू आहे. येणाऱ्या आठ दिवसांत परतीचा पाऊस येण्याची चिन्हे नाहीत. सध्या शेतातही ओल टिकून आहे, अजून काही दिवसांत चांगला पाऊस पडला तर शेतामध्ये वापसा होणार नाही त्यामुळे दिवाळीनंतर साखर कारखाने सुरू करावेत अशी मागणी विस्माने साखर आयुक्तालयाकडे केली होती. (Maharashtra Sugar Factory Starting Date latest Updates)
तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र २ लाख हेक्टरने कमी झाले असून साखर कारखान्यांसाठी परिपक्व उसाचा पुरवठा व्हावा आणि रिकव्हरी चांगली निघावी यासाठी मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १५ दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणावर कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांसाठी जातो. पण यंदा कर्नाटक राज्यातही साखर कारखाने १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी महाराष्ट्रातील राज्याला दिल्यामुळे आपण १५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
मंत्री समितीच्या या बैठकीमध्ये डॉ. कुणाल खेमनार (साखर आयुक्त) व श्री मंगेश तिटकारे (सहसंचालक, साखर) यांनी लिहिलेले एफआरपी माहिती पुस्तिका २०२४ चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील , शिवेंद्रराजे भोसले, पी. आर. पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ), बी. बी. ठोंबरे (विस्मा), डॉ. राजगोपाल देवरा (अपर मुख्य सचिव, सहकार) हे उपस्थित होते.
राज्यामध्ये यंदा उसाची लागवड कमी आहे. तर अजून मान्सूनचा पाऊस सुरू असल्यामुळे उसाला चांगली रिकव्हरी मिळावी आणि परिपक्व ऊस कारखान्यांना मिळावा यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख बैठकीत ठरवण्यात आली. ही तारीख मुख्यमंत्र्यांना कळवून गाळप सुरू करण्याचा अधिकृत निर्णय होईल.- कुणाल खेमनार (साखर आयुक्त)