Pune : "गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले. पण ते पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ते हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर साखर कारखाने सुरू होणे कठीण आहे" अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला आव्हान दिले आहे. साखर गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर लोकमत अॅग्रोशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
(Sugar Factory Crusing Season Starting Date Latest Updates)
दरम्यान, आज मुंबईमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये १५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्यावर एकमत झाले. साखर कारखान्यांसाठी परिपक्व उस मिळावा आणि उसाची रिकव्हरी वाढावी, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल या हेतूने बैठकीत हा निर्णय घेतला. मागच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू झाले होते. त्यातुलनेत यंदा पाऊस चांगला होऊनही पंधरा दिवस उशिराने साखर कारखाने सुरू होत आहेत. म्हणून यंदा गाळप हंगाम मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना उसाचे चांगले पैसे मिळावेत यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. आंदोलनाचे स्वरूप मोठे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रतिटन १०० रूपयांचा वाढीव दर देण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांना लक्ष्य करून उसाला वाढीव हमीभाव जाहीर केला पण साखर कारकाने वाढीव दर शेतकऱ्यांना देत नाहीत. साखर कारखाने सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काचे १०० रूपये द्यावेत. शेतकर्यांना आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर गाळप हंगाम सुरू होणे कठीण आहे असं ते लोकमत अॅग्रोशी बोलताना म्हणाले आहेत.
साखर कारखाने शेतकऱ्यांना हमीभावाएवढा दर देत नाहीत. यावर्षी सरकारने जरी ३ हजार ४०० रूपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी साखर कारखाने किती दर देणार हे जाहीर करावे. त्याचबरोबर २०२२-२३ मध्ये तुटून गेलेल्या उसाला १०० रूपये प्रतिटन वाढीव भाव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले होते. तेही पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हंगाम सुरू होणे कठीण आहे
- राजू शेट्टी (संस्थापक, अध्यक्ष - स्वाभिमानी शेतकरी संघटना)