Pune : साखर आयुक्तालयाच्या वतीने कारखान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी साखर कारखान्यांच्या हेल्थ सर्टिफिकेटची अट आता काढून टाकण्यात आली आहे. यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला असून येणाऱ्या काळात साखर कारखान्यांच्या आवारात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी चालना मिळणार आहे. यासंदर्भातील सूचना साखर आयुक्तालयाकडून साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती व इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचे भांडवली खर्चाचे प्रस्ताव आर्थिक व प्रशासकीय मंजूरीसाठी साखर आयुक्त कार्यालयास सादर केले जातात. या भांडवली खर्चाची निकड, योग्ययोग्यता, त्यापासून मिळणारे उत्पन्न व परतफेड क्षमता तपासून सविस्तर प्रकल्प अहवाल कारखान्यांना करुन घेणे आवश्यक असते. त्यासाठी कारखान्याची आर्थिक स्थिती पाहून भांडवली गुंतवणूकीसाठी आयुक्तालयाकडून हेल्थ सर्टीफिकेट दिले जाते. हेल्थ सर्टीफिकेट शिवाय प्रकल्प अहवाल करु नये अशाही सूचना साखर आयुक्तालयाकडून देण्यात आल्या होत्या.
सौरउर्जा प्रकल्प उभारणीसाठी अनेक कारखाने उत्सुक आहेत. कारखान्यांकडील अशा प्रस्तावांना मान्यता देण्याकरिता कारखान्याची आर्थिक क्षमता व परतफेड क्षमता पाहून कारखान्यांना हेल्थ सर्टीफिकेट दिले जाते व सदर हेल्थ सर्टीफिकेट शिवाय कारखान्यांना संस्थांकडून प्रकल्प अहवाल तयार करुन मिळत नाही, या सर्व प्रकियेमध्ये कारखान्याचा बराचसा वेळ जातो.
केंद्र शासन व राज्य शासनाचे सौर प्रकल्प धोरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आणि राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडून प्राप्त होणारे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे प्रस्ताव विना विलंब मंजूर करण्यासाठी कारखान्यांना हेल्थ सर्टिफिकेट घेण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांनी या कार्यालयाकडून हेल्थ सर्टीफिकेट घेण्याची आवश्यकता नाही. सहकारी साखर कारखान्यांनो संबंधित एजन्सी कडून डी.पी. आर. तयार करुन या कार्यालयाची आर्थिक व प्रशासकीय मंजूरी घ्यावयाची आहे.