Pune : राज्यातील गाळप हंगामाला अखेर आज मुहूर्त लागला असून राज्यभरातील साखर कारखाने आजपासून सुरू झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाळप हंगाम दहा दिवस उशिराने सुरू करण्याचा प्रयत्न राजकीय नेते आणि राज्य सरकारच्या स्तरावर सुरू होता. पण मंत्री समितीने ठरवलेल्या तारखेलाच म्हणजे १५ नोव्हेंबर रोजीच गाळपाला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरू होण्यासाठीच्या हालचाली लक्षात आल्यानंतर साखर महासंघाने आणि विस्माने या निर्णयाचा कडाडून विरोध केला होता. अनेक राजकीय नेत्यांनी गाळप हंगाम पुढे ढकलण्यावर सहमती दर्शवली होती. पण हा निर्णय राज्य स्तरावर आणि निवडणूक आयोगाकडे होता.
साखर आयुक्तालयाने आजपर्यंत ५१ सहकारी आणि ५१ खासगी साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना दिला आहे. पण निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या निर्णयाचे पालन साखर कारखान्यांना करावे लागणार असल्याची सक्त ताकीदही कारखान्यांना दिलेल्या परवान्यावर दिलेली आहे. उर्वरित साखर कारखान्यांना परवाने देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून अनेक उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतर करत असतात. यामुळे या कामगारांना मतदान करता येणार नाही या अनुषंगाने गाळप हंगामच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू होत्या पण अखेर आज गाळप हंगामाला सुरूवात झाली आहे.