Sugar Factory
वसमत :
टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे ११ महिन्यांचे वेतन व 'पीएफ'ची रक्कम थकली असल्याने कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या कारखान्याची पूर्व हंगामी कामे बंद पडली असल्याने भविष्यात कारखाना गाळप करणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
याच अनुषंगाने येत्या मंगळवारपासून थकीत वेतन व पीएफसाठी कारखाना परिसरात कामगार उपोषण सुरू करणार आहेत.
यासंदर्भात कामगार युनियनकडून कारखाना प्रशासनाला निवेदनही दिले आहे. वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा सहयोग तत्त्वाचा करार अपुर्ण राहिला आहे.
परभणी जिल्ह्यातील एका कारखान्याने टोकाईत करारापूर्वीच आर्थिक गुंतवणूक केली आहे. कारखान्याच्या कामगारांना डावलून बाहेरील कामगारांमार्फत पूर्व हंगामी कामे काही दिवसांपूर्वी सुरू केली होती.
त्यामुळे संतप्त कामगार व संचालकांनी कारखान्याचा करार न होताच बाहेरील कामगार कारखान्यावर कसे? करार झाला नाही तर मनमानी करता का?
असा प्रश्न उपस्थित करत बाहेरील कामगारांना पिटाळून लावले होते. तेव्हापासून कारखान्याचे काम बंद आहे.
दिवाळीनंतर कारखाना गाळपाला सुरुवात केली जाते. परंतु, कारखान्यावरील संकटे वाढतच असल्याने भविष्यात कारखाना गाळप करणार की नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वेळीच वेतनाबाबत तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी टोकाई सहकारी साखर कारखाना कामगार युनियनतर्फे कारखाना प्रशासनाला ११ महिन्यांचे थकीत वेतन व पीएफची रक्कम २३ सप्टेंबरपर्यंत द्यावी.
अन्यथा २४ सप्टेंबरपासून कारखाना स्थळावर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन देत इशारा दिला आहे. या निवेदनावर कोंडबा कदम, बाजीराव देशमुख, अनिल इंगोले, सोपान देशमुख, गणपती मुंजाळ, विठ्ठल वारे, नामदेव कुटे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत
बाहेरून कामगार आणलेच कशाला?
स्वजिल्ह्यातील कामगार चांगले काम करत असताना कारखाना प्रशासनाने बाहेरून कामगार आणलेच कशाला? इथल्या कामगारांना काम येत नाही का? कमी पैशांवर कामगार आणले असतील तर सध्याच्या कामगारांना नोटीस न देता कमी करायचे काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
परभणी जिल्ह्यातील कारखान्यांची घाई कशासाठी
टोकाई सहकारी साखर कारखान्याचा कोणताही करार झालेला नाही. त्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील एका कारखान्याने टोकाईत गुंतवणूक केली असल्याची माहिती आहे. टोकाईसाठी करार नसताना गुंतवणुकीची इतकी घाई कशासाठी केली जात आहे? हे मात्र कळायला मार्ग नाही.