शरद यादव
साखर कारखान्यांचा वजन काटा गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन केला आहे. त्यामुळे चोख वजन होते अशा भ्रमात राहण्याचे कारण नाही. ऑनलाइन काट्यातूनही शेतकऱ्यांचा काटा काढण्याचे काम सुरूच आहे.
जगात असा कोणता व्यवसाय असेल की त्यात आपल्या मालाचे बाहेर वजन करता येत नाही, त्याला अपवाद केवळ साखर उद्योग, उसाचे वजन या विषयाबाबत बोलायचेच नाही, असा अलिखित नियमच तयार झाला आहे. शासनाचा विभाग पाहणीचे नाटक करतो अन् सगळ कसं बिनचूक चालू आहे, याचे प्रमाणपत्र देतो.
ऊस कारखान्याला घालवून शेतकरी निवांत होतो मात्र डोळ्यामाधारी काटामारीचा खेळ कसा चालतो, रात्रीचीच वाहने जादा उतरून का घेतली जातात, बाहेरून वजन करायला वाहतूकदार का घाबरतात, ऑनलाइन काट्याजवळ कारखान्यांनी संगणक का बसविला आहे, यावर सडेतोड प्रकाश टाकणारी मालिका आजपासून..
तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने २०२२ मध्ये राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करण्यात आले.
वजनात पारदर्शकता यावी, तसेच काटामारीतून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे हा यामागचा हेतू होता. परंतु कारखानदारांनी या कायद्यालाही ढाक लावून टप्याटप्प्याने यातील तरतुदी काढून काटामारीचा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे.
यात सर्वच कारखानदार दोषी आहेत असे अजिबात नाही. परंतु अनेक कारखाने शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा उठवून स्वतःचे खिसे भरत आहेत. कर्नाटकातील साखर कारखाने तर काटामारीतून ओरबडूनच खात असल्याचा अनुभव आहे.
काटे ऑनलाइन झाल्यानंतर वजनकाट्यावरील वे इंडिकेटरला संगणक जोडायचे नाही, असा कायदा केला, अन्यथा नूतनीकरण प्रमाणपत्र देण्याचे थांबविण्यात आले. यावर कारखाना लॉबीने संबंधित अधिकाऱ्यालाच बाजूला करून कायदा मोडून काढला.
त्यावेळी आयटी अॅप्रोल सॉप्टवेअर बंधनकारक केले होते, तेही शिथिल केले. तिसरे परिपत्रक काढून सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आल्यामुळे काटामारीचे रान मोकळे झाले, भरारी पथके काढून वैधमापक नियत्रंण विभागाकडून काटे तपासणीची मोहीम सुरू केली.
या पथकाला अद्याप एकही कारखाना काटा मारताना सापडला नसेल व छापा टाकेल तेथे चोखचे प्रमाणपत्र देण्यात येत असेल तर बुडणाऱ्या बँकेला 'अ' प्रमाणपत्र देणारा लेखापरीक्षक वा विभागाचा मार्गदर्शक असल्यासारखेच आहे.
वे इंडिकेटरला संगणक जोडल्याने काय होते
१) वजन काट्याच्या वे-इंडिकेटरला केवळ प्रिंटर जोडला तर त्यात केवळ ट्रॅक्टरचा नंबर, शेतकऱ्याचे नाव व मोबाइल नंबर एवढेच टाकण्याची सोय आहे. वजन दर्शविणाऱ्या आकड्यात कोणताच फेरफार करता येत नाही.
२) वजन केल्यावर केवळ प्रिंट देता येते परंतु या वे-इंडिकेटरला संगणक जोडले तर वजनात बदल करणे सहज शक्य होते. नेमका याचाच लाभ काही कारखानदार उचलत असून रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या मालावर राजरोस डल्ला मारला जात आहे.
एका मिनिटात शेतकऱ्याला येतो संदेश
ज्या शेतकऱ्याच्या उसाचे वजन केले आहे त्याचा मोबाइल नंबर त्यात टाकला असता एका मिनिटात किती वजन झाले याचा संदेश शेतकऱ्याच्या मोबाइलवर जाण्याची सोय आहे. येथे मात्र आठ दिवस गेले तरी नेमका कोणत्या कारखान्याला ऊस गेलाय हेच शेतकऱ्याला कळत नाही. भारताने चांद्र मोहीम यशस्वी केली आता मंगळावर जायची तयारी सुरू आहे, असे असताना साखर कारखाने बाराव्या शतकात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो.
कर्नाटकचे कारखाने गबरसिंगचे भाऊ
कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील सीमाभागातील ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातील कारखान्यांना पाठविला जातो. परंतू काटामारीत पीएचडी केल्यासारखेच वर्तन या कारखान्यांचे आहे. २० टनाच्या खेपेला एक ते दीड टन काटा मारला जात असल्याच्या तक्रारी शिरोळचे शेतकरी करत आहेत.
सगळे चोख मग बाहेर वजन करायला का घाबरता
अनेक साखर कारखाने बाहेरून वजन केलेल्या वाहनाला आत प्रवेशच देत नाहीत. परंतु शेतकरी स्वतःच्या मालाचे वजन करून आला तर त्यात चूक काय, जगात असा कोणता धंदा आहे जेथे खरेदीदार डोळ्यामाधारी वजन करणार अन् ते ग्राहृा मानायचे. परंतु यातच खरी मेख आहे. सर्वच शेतकरी जर बाहेरून वजन करून यायला लागले तर कारखानदारांची दुकानदारी थांबेल, या भीतीने वाहतूकदारावर दबाव टाकून बाहेर वजन करण्यास मज्जाव केला जात असल्याचे दिसून येते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये साखर कारखान्यांच्या वजन काट्याबद्दल संशयाचे वातावरण आहे. हा संशय दूर करणे ही कारखाने आणि सरकार यांची संयुक्त जबाबदारी आहे. काटामारी रोखण्यासाठी सरकारने जी भरारी पथके नेमली आहेत त्यातून काटामारी रोखता येणार नसून उलट काटामारी अधिकृत होत आहे. सरकारला जर खरोखरच काटामारी रोखून शेतकऱ्यांचे नुकसान टाळायची इच्छा असेल तर वे-इंडिकेटरला संगणक जोडायला बंदी घातली पाहिजे. तसेच ये-इंडिकेटरलाच प्रिंटर लावून वजनाच्या पावत्या काढून शेतकऱ्यांना देण्याची पद्धत अवलंबवावी लागेल तस्व काही प्रमाणात काटामारीवर अंकुश ठेवणे शक्य आहे. - धनाजी चुडमुंगे, प्रमुख आंदोलन अंकुश संघटना