अरुण बारसकर
सोलापूर : साखरेचा दर प्रतिक्विंटलला ३,९०० रुपयांवर गेल्याने साखर कारखानदारांना चांगले दिवस आले असताना इथेनॉलच्या दरात प्रतिलिटरला दीड ते तीन रुपयांची वाढ होण्याचे संकेत भारतीय साखर संघांकडून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला घसघशीत दरवाढ मिळण्याची शक्यता आहे.
साखर विक्रीच्या आधारभूत (कमीत कमी विक्री दर) प्रतिक्विंटलला ३,१०० रुपये असलेल्या दरात वाढ करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून साखर कारखान्यांकडून होत होती. मात्र, केंद्र सरकार दरवाढ करीत नव्हते. केंद्र सरकार साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढ करीत नसल्याचे कारण उसाला भाव वाढ देताना सांगितले जात होते. मात्र इथेनॉल, साखर व इतर बाबींतून येणाऱ्या पैशातून एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात होती. मागील वर्षभरात साखरेचे दर टप्प्याटप्प्याने वाढत आहेत.
सध्या साखरेला ग्रेडनुसार क्विंटलला ३,७५० ते ३,९०० रुपये दर मिळत असल्याचे साखर कारखान्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय इथेनॉलच्या सध्याच्या दरात लिटरला दीड ते तीन रुपये वाढ येत्या आठवडाभरात होईल, असे भारतीय साखर महासंघाकडून सांगण्यात आले. साखर व इथेनॉलच्या दरात पुढील काही दिवसांत आणखीन वाढ होईल, असेही सांगण्यात येत आहे. याचा फायदा साहजिकच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून, एफआरपीपेक्षा अधिक दर मिळतील. असे साखर उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येते.
इथेनॉल ५६ वरून ६६ वर
केंद्र सरकारने मका व खराब धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटरला ५६ रुपयांवरून ६६ रुपये केला आहे, तर खराब धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटरला ६४ रुपये दर केंद्र सरकारने केला आहे. धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या विक्री दरात वाढ केली असली तरी उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल खरेदीचे दर केंद्र सरकारने वाढविले नाहीत. ते पुढील आठवड्यात वाढतील, असे सांगण्यात आले.
एक किलो साखर उत्पादनासाठी ३६ ते ३७ रुपये खर्च येतो. त्यामुळे साखरेचे दर वाढले तरी फारसा फरक पडत नाही. चार वर्षे साखरेला दर नव्हता त्यावेळी कारखान्यांनी तोट्यात कारखाने चालविले आहेत. इथेनॉलचे दर केंद्र सरकार वाढविणार आहे; परंतु निर्णय झालेला नाही. - जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, भारतीय साखर महासंघ