यंदा दुष्काळी स्थितीमुळे उसाचे उत्पादन आणि परिणामी साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी असल्यामुळे साखरेचे दरही जास्त असतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. यंदाचा गाळप हंगाम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या मध्यापर्यंत चालेल असा अंदाज होता पण सध्याच्या स्थितीनुसार हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
साखर संकुलाच्या १९ फेब्रुवारी अखेरच्या उस गाळप अहवालाच्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत ८३४.६३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून त्यामधून ८२७.२३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखाने मिळून दैनिक गाळप क्षमता ही ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रीक टन उस गाळपाची आहे.
दरम्यान, राज्यातील आत्तापर्यंतचे साखर उत्पादन हे मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे ६९ लाख क्विंटलने कमी झाले आहे. तर मागच्या वर्षी याच वेळेस ८९६.५९ लाख क्विंटल सारखेचे उत्पादन झाले होते. केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर अटी आणि शर्ती घातल्यामुळे कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास अडचणी येत असल्याची ओरड कारखान्यांकडून होत असून अनेक शेतकरी नेते इथेनॉल निर्मिती सुरू करण्यासाठी मागणी करत आहेत.
५ कारखान्यांचे गाळप बंद
राज्यात चालू हंगामात २०७ कारखान्यांना क्रशिंग परवाने साखर संकुलाकडून देण्यात आले होते. त्यामध्ये १०६ सहकारी तर १०५ खासगी कारखाने होते. यंदा परवाने मिळालेल्या २०७ कारखान्यांपैकी ५ कारखान्यांनी आपले गाळप थांबवले असून २०२ साखर कारखान्यांचे गाळप अजून सुरू आहे.
कधीपर्यंत चालणार कारखाने?
यंदा महाराष्ट्रात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. तर इतरत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे उसाचा हंगाम आखडणार अशी स्थिती होती पण नोव्हेंबरअखेर झालेला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी उसशेतीसाठी फायद्याची ठरली आहे. या पावसामुळे जे शेत पाण्याविना वाळून जाण्याच्या स्थितीत होते त्यांना एका पाण्याची सोय झाली. परिणामी उसाचे उत्पादन वाढले असून यंदाचा गळीत हंगाम मार्चच्या अखेर ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.