देशभरातील एकूण ५३४ कारखान्यांपैकी तमिळनाडूतील तीन कारखान्यांचा अपवाद वगळता, २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाची ३१ मेअखेर सांगता झाली. त्यानुसार यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे, तर साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले आहे. देशात यंदा महाराष्ट्राने साखर उत्पादन पहिला क्रमांक पटकावला असून, राज्यात ११०.२० लाख टन उत्पादन झाले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशने १०३.६५ लाख साखरेचे उत्पादन घेतले आहे.
तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांतील विशेष गाळप हंगामदेखील सप्टेंबरपर्यंत चालणार असून, त्यातून तयार होणारे अपेक्षित साखर उत्पादन लक्षात घेऊन यंदाच्या हंगामअखेर देशपातळीवर एकूण ३२१.२५ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. तर २१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाणार आहे.
यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसाचे गाळप झाले असून, ते गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे. तसेच निव्वळ साखरेचे उत्पादनदेखील गतवर्षीपेक्षा ९.६५ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, यंदा देशपातळीवर सरासरी साखर उतारा १०.२० टक्के मिळाला असून, तो गेल्या वर्षी पेक्षा ०.२६ टक्क्याने जास्त आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या यंदा पर्जन्यमान सर्वदूर आणि समाधानकारक राहण्याचा अंदाज असून, त्याचा फायदा उसाच्या वाढीसाठी तसेच आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
नवीन लागण होणाऱ्या उसाची उपलब्धता ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामासाठी होणार नसून तो ऊस पुढील वर्षाच्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामामध्ये वापरला जाईल.
त्यामुळे २०२४-२५ च्या हंगामात साखर उत्पादन वाढणार नाही. परिणामी, आतापासूनच साखर उत्पादनाचे अंदाज वर्तविणे घाईचे होईल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केले आहे.
राज्यनिहाय साखर उत्पादन (लाख टनांमध्ये)महाराष्ट्र ११०.२०उत्तर प्रदेश १०३.६५कर्नाटक ५२.६०गुजरात ९.२०तमिळनाडू ८.८५बिहार ६.८५पंजाब ६.२०हरयाणा ५.९०मध्य प्रदेश ५.२०उत्तराखंड ३.१०आंध्र प्रदेश १.६०उर्वरित देश १.५०
अधिक वाचा: Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला?