पुणे : राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. तर यंदा उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असतानाही कारखाने जास्त काळ चालले आहेत. त्याचबरोबर उसाचे उत्पादनही मागच्या वर्षींच्या तुलनेत वाढलेले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन वाढल्याचं साखर आयुक्तांच्या अहवालातून समोर आले आहे.
दरम्यान, राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले असून साखर आयुक्तालयाच्या १ एप्रिल रोजीच्या अहवालानुसार १५१ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे तर ५६ साखर कारखान्या चालू असून त्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप येणाऱ्या ५ ते १० दिवसांत संपण्याची शक्यता आहे.
आयुक्तालयाच्या अहवालानुसार १ हजार ५० लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून १ हजार ७४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर मागच्या वर्षी याच वेळेस १ हजार ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते तर १ हजार ५२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढले असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
कसे वाढले साखरेचे उत्पादन?मान्सूनच्या सुरूवातीला राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. त्यामुळे उस पिकाला फटका बसेल आणि ऊसासोबत साखरेचे उत्पादनही घटेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती पण नोव्हेंबरच्या अखेर पडलेल्या अवकाळी पावसाचा फायदा उस शेतीला झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
त्यामुळे उसाच्या उत्पादनात वाढ होऊन साखरेचे उत्पादन वाढले आहे. तर केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये उसाचा रस, पाक आणि थेट साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणल्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.