पुणे : उसाचा गाळप हंगामात शेवटच्या टप्प्यात असून अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. राज्यातील २०७ साखर कारखान्यांनी यंदा उसाचे गाळप केले असून ११ एप्रिल अखेरच्या साखर संकुलाच्या अहवालानुसार राज्यातील १८५ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले असून २२ साखर कारखान्यांचे गाळप अद्याप सुरू आहे.
दरम्यान, यंदा राज्यात बहुतांश भागात दुष्काळ असल्यामुळे उसाचे आणि परिणामी साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली होती. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. या गाळप हंगामात १ हजार ८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
मागच्या वर्षी याच वेळी १ हजार ५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. तेच उत्पादन आता ३७ लाख क्विंटलने वाढले असून १ हजार ८९ लाख क्विंटलवर गेले आहे. त्यामुळे यंदाच्या साखरेच्या उत्पादनाबाबतचे अंदाज चुकीचे ठरले आहेत.
दरम्यान, ११ एप्रिल अखेर राज्यात १ हजार ६३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. तर मागच्या वर्षी १ हजार ५३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. त्यामुळे उसाचे गाळपही १० लाख टनांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे.
का वाढले उसाचे उत्पादन?
राज्यात दुष्काळ असूनही उसाचे उत्पादन वाढले आहे. तर नोव्हेंबर अखेरीस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. हा पाऊस ऊस शेतीसाठी फायद्याचा ठरला असल्याने उसाचे उत्पादन वाढले आहे.
साखरेच्या उत्पादनात वाढ
यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत उस उत्पादन आणि साखर उत्पादन वाढले आहे. विषेश म्हणजे साखर उताऱ्यामध्येसुद्धा ०.२५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले आहे. मागच्या वर्षी साखरेचा उतारा हा १० टक्के एवढा होता. तर यावर्षी साखरेचा उतारा १०.२५ टक्के एवढा आहे. दरम्यान, केंद्र सरकारने थेट साखरेपासून आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंधने घातल्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.