Join us

Sugar Production : जगात साखरेचे उत्पादन वाढणार? भारतावर काय होतील परिणाम?

By दत्ता लवांडे | Published: October 05, 2024 7:18 PM

Sugar Production : अनेक साखर कारखाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदिपन सोहळासुद्धा करतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उसाचा गाळप हंगाम हा १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. तर यंदा देशात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 

Pune : देशभरातील उसाचा गाळप हंगाम येणाऱ्या काही दिवसांत सुरू होणार असून साखर कारखान्यांनी गाळपाची संपूर्ण तयारी केली आहे. तर अनेक साखर कारखाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदिपन सोहळासुद्धा करतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उसाचा गाळप हंगाम हा १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून यंदा देशात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 

मागच्या वर्षी म्हणजेच २०२३-२४ च्या गाळप हंगामात राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता होती. तरीही महाराष्ट्रात ११० लाख टन साखरेची निर्मिती झाली. तर देशामध्ये ३१६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. जगामध्ये एकूण १ हजार ८३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्यातील ३३ टक्के वाटा म्हणजेच ४५० लाख टन साखरेचे उत्पादन केवळ ब्राझील या देशाने काढले आहे. अमेरिका या देशानेही मागच्या हंगामात ८० लाख टन साखरेचे उत्पादन काढले. 

मागच्या हंगामात देशांतर्गत साखरेचे उत्पादन घटले होते. देशात उसाचे गाळप हे १७९ लाख टनांनी कमी होते. तर साखरेचे उत्पादनही १० लाख टनांनी कमी झाले. पण यंदाच्या गाळप हंगामात साखरेचे किती उत्पादन होईल यासंदर्भात साशंकता आहे. तर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

दरम्यान, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, चीनमधील साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये या हंगामात ६ लाख टन साखरेचे उत्पादन वाढणार आहे. तर ब्राझील आणि युरोपीय देशांमध्ये साखरेचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजामुळे जगातील साखरेचे उत्पादन हे १ हजार ८६० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. 

काय होणार परिणाम?जागतिक साखरेच्या उत्पादनात वाढ झाली तर देशांतर्गत साखरेचे दर खाली येण्याची शक्यता आहे. असे झाले तर साखर कारखाने अडचणीत सापडू शकतात. त्याचबरोबर यामुळे उसाच्या रसापासून आणि थेट साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. जागतिक साखर उत्पादनवाढीचा निर्यातीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीशेती क्षेत्र