Join us

गाळप हंगाम संपला! राज्यात 'या' कारखान्याची ऊस गाळपात अन् साखर उत्पादनात बाजी

By दत्ता लवांडे | Published: May 16, 2024 6:26 PM

लांबलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे.

Maharashtra Sugarcane Crushing Season 2023-24: राज्यभर लांबलेला गाळप हंगाम अखेर १४ मे अखेरीस संपलेला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मानस अॅग्रो हा साखर कारखाना शेवटी बंद झाला असून राज्यातील संपूर्ण २०७ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. यामुळे साखर आयुक्तालयाकडून गाळपाचा शेवटचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

दरम्यान, यंदा महाराष्ट्रात १०४ खासगी आणि १०३ सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यामध्ये बहुतांश साखर कारखान्यांनी एप्रिलअखेर गाळप थांबवले होते. ज्या भागांत ऊस बाकी होता अशा भागांतील साखर कारखाने सुरू होते. पण राज्यातील बहुतांश उसाचे गाळप हे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून झाले आहे. 

राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही अधिक झाले असून यावर्षी एकूण उसाचे गाळप हे १ हजार ७३ लाख मेट्रीक टन एवढे झाले असून त्यातून १ हजार १०१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर राज्यातील सरासरी साखर उतारा हा १०.२७ टक्के एवढा होता. 

राज्यात 'या' कारखान्याची बाजीराज्यातील सर्वांत जास्त उसाचे गाळप हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने केले आहे. या कारखान्याने तब्बल २१ लाख ५४ हजार ७९४ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून याच साखर कारखान्याने राज्यात सर्वांत जास्त म्हणजे १९ लाख ८६ हजार ७२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 

त्यापाठोपाठ कल्लापाण्णा आवाडे जवाहर शेतकरी ससाका हप्परी, ता. हातकणंगले हा कारखाना साखर उत्पादन करणारा दुसरा साखर कारखाना ठरला असून या कारखान्याने १९ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 

विभागवार साखर उत्पादन

  • कोल्हापूर विभाग - २८०.६४ लाख क्विंटल
  • पुणे विभाग - २५१.३१ लाख क्विंटल
  • सोलापूर विभाग - २०६.५९ लाख क्विंटल
  • अहमदनगर विभाग - १४१.१२ लाख क्विंटल
  • छत्रपती संभाजीनगर विभाग - ८८.५३ लाख क्विंटल
  • नांदेड विभाग - १२०.८५ लाख क्विंटल
  • अमरावती विभाग - ९.३९ लाख क्विंटल
  • नागपूर विभाग - ३.२७ लाख क्विंटल
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसाखर कारखानेऊस