सांगली : जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्टयात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ हजार २३४ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.
२०२१-२२ मध्ये एक लाख २२ हजार ८६९ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये १४ हजार २३४ हेक्टरने वाढ होऊन सध्या एक लाख ३७ हजार १०३.९६ हेक्टर झालेले आहे. उसाच्या क्षेत्राबरोबरच जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढून १९ झाली आहे.
जिल्ह्यात नदीकाठासह दुष्काळी पट्टयात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढतेय. २०२४-२५ साठी गाळपासाठी एक लाख ३७ हजार १०३.९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी १४ हजार २३४ हेक्टर क्षेत्रात वाढले आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका उसाला बसला तरी शेतकरी लागवडीसाठी पुढे येत आहेत. २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यात दोन हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यांतील ऊस क्षेत्रात घट झाली आहे.
क्षेत्र वाढले, पण नोंदणी नाही
खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत सध्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, त्याठिकाणचे शेतकरी ऊस नोंदणीसाठी पुढे आले नसल्याचे कारखान्यांनी स्पष्ट केले आहे.
तीन हंगामात उसाची लागवड
- उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील (जुलै-ऑगस्ट) पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदारपणे वाढते.
- तसेच आडसालीच्या पीक वाढीच्या १६-१८ महिन्यांच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते.
- पूर्वहंगामी ऊससुद्धा १४-१५ महिन्यांचा असल्याने त्याचे उत्पादनही चांगले मिळते.
असे वाढले उसाचे क्षेत्र
२०२०-२१ : १,२२,८६९.००
२०२१-२२ : १,२१,९७७.००
२०२२-२३ : १,२४,२६९,००
२०२३-२४ : १,३५,६८८.००
२०२४-२५ : १,३७,१०३.९६
अन्य पिकाला दराची खात्री नाही
भाजीपाल्यासह अन्य पिकांचे उत्पादन घेतले तर त्याला खात्रीशीर बाजारपेठ नाही. दराची हमी नाही. भाजीपाला, कांदा, सोयाबीन पिकांचे दर अचानक कमी होत आहेत. यातून शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणूनच वाळवा, पलूस, शिराळा, कडेगाव तालुक्यांसह दुष्काळी तालुक्यातील शेतकरीही ऊस लागणीकडे वळल्याचे सांगली जिल्ह्यातील चित्र आहे.