पुणे : राज्यातील गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला असून ११ एप्रिल अखेर राज्यातील जवळपास ९० टक्के साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर उर्वरित साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. गाळप थांबवल्यामुळे उसतोड मजुरांची घरी जाण्याची घाई सुरू असून काहीजण घरी पोहोचले आहेत. तर ज्या भागात उसाची उपलब्धता आहे अशा भागांतील साखर कारखान्यांचे गाळप अजूनही सुरू आहे.
दरम्यान, राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. त्यापैकी १०३ साखर कारखाने सहकारी तर १०४ साखर कारखाने खासगी आहेत. ११ एप्रिल अखेरच्या साखर संकुलाच्या अहवालानुसार या २०७ साखर कारखान्यांपैकी १८५ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर २२ साखर कारखान्यांचे गाळप अजून सुरू आहे.
राज्यात आत्तापर्यंत १ हजार ६३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून १ हजार ८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर आत्तापर्यंत सरासरी साखर उतारा हा १०.२५ टक्के एवढा झाला आहे. सर्वांत जास्त उसाचे गाळप आणि साखर उत्पादन हे कोल्हापूर विभागात झाले असून या विभागात १४० लाख मेट्रीक टन उस गाळप झाला आहे.
पुणे विभागात २३४ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून २४६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सर्वांत कमी उसाचे गाळप हे नागपूर विभागात झाले असून या ठिकाणी ४ लाख मेट्रीक टन उस गाळप झाला असून केवळ २ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. दरम्यान, राज्यातील सर्वांत जास्त साखर उतारा हा कोल्हापूर जिल्ह्यातील असून येथे तब्बल ११.५८ टक्के साखर उतारा आला आहे.