पुणे : कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे.
राज्यात यंदा २०० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत १०२ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत.
राज्यात आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, साखर उतारा ९.३८ टक्के इतका मिळाला आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक २१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामाच्या तुलनेत यंदा सात कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला नाही. यंदा ९९ सहकारी व १०१ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांनी साखर गाळप हंगाम सुरू केला होता.
मात्र, गेल्या वर्षाच्या अति पावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी आहे.
त्या जोडीला सध्याचे कोरडे हवामान तसेच अवकाळी पावसाचा अभाव यामुळे साखर हंगाम लवकर संपत आहे. परिणामी आतापर्यंत २०० कारखान्यांपैकी १०२ कारखान्यांनी गाळप संपविले आहे.
साखर उत्पादनाची स्थिती
- सोलापूर विभागात ४५ कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली होती, त्यातील ४१ कारखाने बंद पडले आहेत.
- कोल्हापूर विभागातील ४० कारखान्यांपैकी २२ कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत.
- पुणे विभागातील ३१ पैकी १२ कारखाने बंद केले आहेत.
- अहिल्यानगर विभागातील २६ पैकी सहा कारखाने बंद झाले आहेत.
- राज्यात आतापर्यंत ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ७६.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
- राज्यात आतापर्यंत ९.३८ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
- गेल्या वर्षी याच वेळेला ९५४.३४ लाख टन उसाच्या गाळपातून ९५.२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
हवामान पोषक असल्याने राज्यात गेल्या वर्षी १०.०५ टक्के साखर उतारा मिळाला होता, तर एकूण २०७ गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांपैकी केवळ ३८ कारखाने बंद झाले होते. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे ८६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर