अरुण बारसकर
सोलापूर : राज्यात यंदाच्या हंगामात १९१ साखर कारखान्यांचे ३७१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्यांसमोर ऊस तोडणी यंत्रणा व पुरेशा उसाचा प्रश्न गंभीर असल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण झाले आहे.
दरम्यान, उसाअभावी सांगोला कारखाना बंद करण्यात आला आहे. राज्यात यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत राहिला. त्यातच विधानसभा निवडणुकीमुळेही साखर कारखाने उशिराने सुरू झाले.
मागील १५ दिवसांत साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला वेग घेतला आहे. राज्यात सहकारी ९६ व खासगी ९५ असे १९१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.
या १९१ साखर कारखान्यांकडून ३७१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. ३१९ लाख मेट्रिक टन साखर तयार झाली असून राज्याचा साखर उतारा ८.६१ टक्के इतका आहे.
एकामागे एक साखर कारखाने सुरू झाले तशी ऊस तोडणी यंत्रणा व उसाची अडचण कारखान्यांसमोर येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सहकारी (धाराशिव साखर कारखाना) हंगाम सुरू करून बंदही झाला आहे.
ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा तसेच ऊस क्षेत्र घटल्याचा फटका साखर कारखान्यांना बसत असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत.
यंदा १९१ साखर कारखाने सुरू झाले असले तरी मागील वर्षी यावेळी तब्बल २०५ साखर कारखाने सुरू झाले होते.
मागील वर्षी डिसेंबरपर्यंत २०५ साखर कारखान्यांनी ४५६ लाख ३३ हजार मेट्रिक टन गाळप करून ४०९ लाख मेट्रिक टन साखर तयार झाली होती. साखर उतारा ८.९८ टक्के इतका होता.
सोलापूर जिल्ह्यात गाळप जास्त.. उतारा मात्र कमी
- सोलापूर जिल्ह्यात ३० कारखान्यांचे ऊस गाळप राज्यात सर्वाधिक ५४ लाख मेट्रिक टन झाले असले तरी साखर उतारा मात्र सर्वात कमी ७.८४ टक्के इतकाच आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप ५३ लाख मेट्रिक टन झाले असताना साखर उतारा मात्र १०.३४ टक्के इतका आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने साखर उताऱ्यात आघाडीवर असल्याने एफआरपीही अधिक मिळते आहे.
- पुणे जिल्ह्यातील गाळप ४९ लाख मेट्रिक टन इतके झाले असून साखर उतारा ८.६१ टक्के इतका आहे.
- दरवर्षीच सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा हा फारच कमी असतो.
अधिक वाचा : Reshim Sheti Success Story : रेशीम व्यवसायातून हा जिगरबाज युवा शेतकरी महिन्याला घेतोय एक लाखाचा पगार