Join us

Sugarcane Crushing : कर्नाटकात ऊस देण्यास शेतकऱ्यांनी घाई करू नका जरा हे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 10:18 AM

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; परंतू कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत.

चंदगड : महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; परंतू कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत.

त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कर्नाटकलाऊस घालण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी केले आहे.

सध्या साखर कारखान्यांच्या टोळ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागामध्ये उतरत आहेत आणि ऊस तोड करत आहेत; पण शेतकऱ्यांनी कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या ऊस तोडी घेऊ नयेत.

कर्नाटकातील साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यापेक्षा कमी दर देतात तसेच त्यांच्या वजनामध्ये पारदर्शकता नाही. पहिली उचल दिल्यानंतर आपणाला दुसऱ्या हप्ताची मागणी करता येत नाही.

साखरेतील चढ-उतारानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात; पण कर्नाटकातील साखर कारखान्याकडे मागणी करताना मर्यादा येते.

यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. आपल्या भागातील साखर कारखान्यांचे गळीत चांगल्या प्रकारे झाले तरच त्यांच्याकडे जादा दराची मागणी करता येते.

याचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोड घेण्याची घाई करू नये. तसेच जो कारखाना अधिक दर देतो त्या कारखान्याच्या ऊस तोडी घ्याव्यात, असे आवाहन पाटील यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीकर्नाटकमहाराष्ट्रस्वाभिमानी शेतकरी संघटनाराजू शेट्टीकोल्हापूर