रामेश्वर काकडे
Sugarcane Crushing : नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखाने (Sugar factory) या हंगामात सुरू झालेले आहेत.
सदर कारखान्यांनी १४ जानेवारीपर्यंत ५४ लाख १३ हजार १६३ मेट्रिक टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) केले असून, त्यातून ४८ लाख ६६ हजार ६१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये केवळ तीन कारखान्यांचा १० टक्केपेक्षा अधिक साखरेचा उतारा आला आहे. यावर्षी नांदेड विभागात उसाचे लागवडी क्षेत्र कमी झाल्याने साखरेच्या उत्पादनात घट होईल, अशी शक्यता आहे.
लातूरमध्ये सहकारी व खासगी अशा ११ कारखान्यांनी २१ लाख १७ हजार ९७८ मे. टन उसाचे गाळप केले असून, १८ लाख ८८ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील खासगी व सहकारी, अशा सात साखर कारखान्यांनी १५ लाख ९४ हजार ९३० मे.टन उसाचे गाळप केले असून, त्यातून १४ लाख ५८ हजार ९० क्विंटल साखर उत्पादन झाले.
याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ७ लाख १९ हजार ४१४ मे.टन ऊस गाळप केले, ६ लाख ३३ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. एका यंत्राद्वारे एका दिवसात १२० ते १८० मेट्रिक टन उसाची तोडणी करण्यात येते.
नांदेड जिल्ह्यात ८ लाख ८६ हजार क्विं. साखर उत्पादन या हंगामात नांदेड जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी एकूण ९ लाख ८० हजार ८४१ मेट्रिक टन साखरेचे गाळप केले आहे. त्यातून ८ लाख ८६ हजार ५७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
अजूनही बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस तोडणी बाकी असल्याने मार्चपर्यंत तरी कारखाने चालतील, असे सांगण्यात येते.
अनेक शेतकऱ्यांची गुन्हाळास पसंती
* विभागातील काही तालुक्यांत उसाचे गुन्हाळ सुरू करण्यात आलेले आहेत. कारखान्याला ऊस दिल्यास त्याचे पैसे खात्यावर जमा होण्यास विलंब लागतो.
* त्यामुळे गरजवंत शेतकरी जवळच असलेल्या गुन्हाळाला ऊस देऊन मोकळे होत आहेत.
* गुऱ्हाळ मालकांकडून उसाचे पेमेंट कारखान्यापेक्षा लवकर देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा गुन्हाळाकडेही कल वाढल्याचे दिसून येते.
ऊसतोडणी यंत्रामुळे काम झाले सोपे
* या हंगामापासून प्रादेशिक विभागातील नांदेड जिल्ह्यात चार कारखान्यांसाठी ३८ ऊसतोडणी यंत्र उपलब्ध झाले आहेत.
* तर परभणी जिल्ह्यासाठी ५०, हिंगोली जिल्ह्यासाठी १३ तर लातूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक १७७ ऊसतोडणी यंत्राद्वारे उसाची तोडणी करण्यात येत आहे.
* यावर्षी ऊस कामगारांपेक्षा ऊस यंत्राद्वारे अधिक ऊसतोडणी केली जात आहे.
* त्यामुळे ऊस यंत्र उपलब्ध झाल्यामुळे ऊस तोडणी वेगाने होत आहे. याचा परिणाम ऊस अधिक काळ शेतात पडून राहणार नाही.