तुषार हगारे
भिगवण : गतवर्षीच्या (२०२३-२४) साखर गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी अद्यापही जाहीर केला नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गासह कारखाना सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे.
कमी पर्जन्यमान झाल्याने गतवर्षी उसाचे क्षेत्र देखील कमी प्रमाणात होते परिणामी कारखान्यांकडून कमी ऊस पुरवठा होत असल्याने खाजगी कारखान्यांकडून उसाची पळवापळवी झाली मात्र इंदापूर तालुक्यातील एकाही साखर कारखान्याकडून एफआरपी पेक्षा जास्त ऊस दर देण्यात आला नाही.
इंदापूर तालुक्यामधून बारामती ऍग्रो, दौड शुगर्स, अंबालिका, भीमा पाटस (एमआर. एन शुगर्स), छत्रपती सहकारी, कर्मयोगी, नीरा भीमा या प्रमुख साखर कारखान्यांना जातो. सध्या या वर्षीचा गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यासाठी कारखान्यांकडून लगबग सुरू आहे.
लगतच्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून ३६३६ तर सोमेश्वर कडून ३७७१ रुपये प्रतिटन दर देण्यात आला आहे मात्र इंदापूर तालुक्यातील एकाही साखर कारखान्याकडून ३ हजार रुपयांपेक्षा जास्त ऊस दर दिला नसल्याने ऊस उत्पादक नाराजी दिसून येत आहे.
सध्या शेतातील मशागतींची कामे सुरू असून अतिपावसाने रखडलेल्या ऊस लागवडी करण्याची लगबग चालू आहे. शेतातील तणनाशके, खते, औषधे आदींचा खर्च भागविणे देखील जिकिरीचे बनत चालले आहे. त्याचा परिणाम विविध गावांमधील बाजारपेठेवर दिसून येत आहे.
विधानसभेचे गणित
दसऱ्याला गळीत हंगाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सभासदांकडून राहिलेल्या दुसरे बिल अदा करण्याची मागणी होत आहे. त्यातच दिवाळीत विधानसभा लागण्याची शक्यता आहे. बहुतांश कारखाने लोकप्रतिनिधींचे आहेत. त्यामुळे कोणता कारखाना जास्त दर देईल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०२३-२४ हंगाम प्रमुख कारखान्यांकडून दिलेला दर
सोमेश्वर सह. कारखाना - ३७७१ (अंतिम)
माळेगाव सह. कारखाना - ३६३६ (अंतिम)
बारामती अॅग्रो - २९००
भीमा पाटस - ३०००
कर्मयोगी स. कारखाना - २७००
अंबालिका - २९००
नीरा-भीमा स. कारखाना - २७००
दौंड शुगर्स - २९००
छत्रपती स. कारखाना - ३०००