अरुण बारसकर
सोलापूर : पाऊस कमी पडल्याचा फटका यंदा ऊस गाळपाला बसेल असा साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला असून ९ कोटी मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप झाले आहे. पाच लाखांहून अधिक गाळप तब्बल ६६ कारखान्यांनी केले आहे.
तर १५ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप राज्यातील तीन कारखान्यांनी केले आहे. सरलेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने ऊस गाळप कमी होईल, असा अंदाज व्यक्त करत साखर कारखान्यांनी ऊस गाळप नियोजन केले होते.
मात्र, मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसाचा ऊसवाढीसाठी चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे राज्यातील साखर हंगामही लांबला आहे. जेमतेम तीन महिने हंगाम चालेल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज होता. मात्र, ऊस तोडणी यंत्रणा कमी असल्याने पूर्ण क्षमतेने बहुतेक कारखाने गाळप करू शकले नाहीत.
फेब्रुवारी अखेरपर्यंत राज्यातील २०७ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १३ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ९०९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करीत ९५६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्याचा साखर उतारा ९.९१ होता तर यंदा १०.३ टक्क्यांपर्यंत आहे.
'बारामती अॅग्रो'चे २० लाख गाळप
राज्यातील तब्बल ६६ साखर कारखान्यांचे ऊस गाळप ५ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती अॅग्रोचे गाळप १९ लाख इतके झाले असून २० लाखाकडे वाटचाल सुरू आहे.
दौंड शुगरचे १६ लाख मेट्रिक टन, सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे गाळप १५ लाख मेट्रिक टन, कोल्हापूर जिल्ह्यातील कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारीचे गाळप सव्वाचौदा लाख, अहमदनगर जिल्ह्यातील इंडिकॉन डेव्हलपर्स कर्जतचे गाळप सव्वाबारा लाख तर सातारा जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा रेठरे कारखान्यांने १२ लाखांहून अधिक मेट्रिक टन गाळप केले आहे.
राज्यात सर्वाधिक १४६ लाख मेट्रिक गाळप सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे १३२ लाख, पुणे जिल्ह्याचे गाळप ११० लाख तर अहमदनगर जिल्ह्याचे १०६ लाख मेट्रिक टन झाले आहे.
२० लाख मेट्रिक टनांपर्यंत गाळप करुन राज्यात प्रथम असलेल्या बारामती अॅग्रोचा साखर उतारा केवळ ९ टनांपर्यंत आहे. दौंड शुगरचा उतारा ९.६३ टक्के, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा साखर उतारा ९.४४ टक्के इतका आहे. सर्वाधिक गाळप करणाऱ्या बारामती शुगरपेक्षा दौंड शुगर व विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा साखर उतारा अधिक आहे