Sugarcane cultivation :
बद्रीनाथ मते
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे रब्बीत ऊस पिकांकडे कल वाढताना दिसतोय. तीर्थपुरी येथील अंबड व घनसावंगी तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नदी- नाल्यांना पाणी आले आहे. त्यामुळे जमिनीची पाणी पातळीत वाढली आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यातील साठवण तलाव पूर्णपणे भरले असून गोदावरीवरील असणारी मोठी बंधारे तुडुंब भरले आहे. पैठण नाथसागरही शंभर टक्के भरला यामुळे डाव्या कालव्याचा आधार घेत शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यापासून ऊस लागवडीवर भर दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. या तालुक्यातून जायकवाडी धरणाचा डावा कालवा गेलेला आहे. तसेच शहागड, पाथरवाला, जोगलादेवी, मंगरूळ, शिवणगाव येथे गोदावरीवर उच्च पातळी बंधारे असल्याने ते तुडुंब भरलेले आहेत. मुबलक पाणी असल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस सोयाबीनप्रमाणे आता ऊस लागवडीकडे वळले आहेत.
मागील काही वर्षांपासून कापूस पिकावर आलेले अतिवृष्टीचे संकट यामुळे शेतकरी इतर पिकाकडे वळू लागले आहेत. अंबड व घनसावंगी तालुक्यात जमिनीचे क्षेत्र जास्त असल्याने कापसाचे प्रमाण सोयाबीन पिकाचेही प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये खरीप क्षेत्र आहे. परंतु सोयाबीनला अतिवृष्टीमुळे फटका बसत असल्याने शेतकरी खात्रीशीर पिकाकडे वळू लागले आहे.
'या' गावात होते ऊस लागवड
अंबड व घनसावंगी तालुक्यातील शहागड, गोंदी, साडेगाव, तीर्थपुरी, मंगरूळ, बानेगाव, जोगलादेवी, भोगगाव, रामसगाव, राजाटाकळी, शिवणगाव, भादली, कुंभार पिंपळगाव या परिसरातील नदी काठावर उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दोन्ही तालुक्यातील कार्यक्षेत्रामध्ये २८ हजार हेक्टर ऊस असून त्यामधून अंदाजे २१ लाख टन ऊस निर्माण होणार आहे.
गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतानाही कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला नाही. यावर्षी नवीन उसाचे मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे पुढील वर्षी साखरेचे गाळप वाढणार आहे. त्यामुळेच तीर्थपुरी शहरामध्ये जागेचे भाव साधारण ५ हजार २०० स्क्वेअर फूट झाले आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर जागेची खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. जमिनीचे दर एकरी २५ लाख झाले आहेत.