sugarcane cultivation :
बालाजी आडसूळ :
कळंब : मागील पावसाळ्यात वरुणराजा मापून तोलून बरसल्याने उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. यंदा मात्र पाऊस धो धो बरसला. पर्जन्यमापकाच्या नोंदीत सरासरी ओलांडणारा ठरला. याची परिणीती होऊन तालुक्यात पुन्हा उसाची 'बागायती' बहरत असून गावोगावी उसाची लागवड जोमाने होत आहे.
कळंब तालुक्यात मांजरा प्रकल्पाच्या बॅकवॉटरला कळंब ते दाभा अशी गावे येतात. याशिवाय लाभक्षेत्राचा "लाभ" काही गावांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होतो तसेच इतर लघु पाटबंधारे प्रकल्प, नदीकाठच्या भागात चांगला पाऊसकाळ झाल्यास बागायती शेतीला मोठा वाव असतो.
एकदा पाणीपातळी वाढली, जलसाठवण स्त्रोतांत पाण्याची बक्कळ उपलब्धता झाली की मग या भागातील शेतकऱ्यांचे पाय उसाची लागवड करण्याकडे वळतात. तालुक्यात सर्वसाधारण १५ हजार हेक्टर ऊस असतो.
मात्र, मागील वर्षी पावसाचा आलेख उतरता राहिल्याने उसाच्या शेतीवर संक्रांत ओढवली होती. क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. यंदा, मात्र नवी लागवड जोमात सुरू आहे. यात फेब्रुवारीपर्यंत सातत्य राहणार आहे. एकूणच तब्बल ४ ते ६ हजार हेक्टरवर नवीन उसाची लागवड होण्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी 'लोकमत ऍग्रो' शी बोलताना व्यक्त केला.
नव्या उसाची लागवड...
तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उसाची बागायती वाढत असून तालुक्यातील सर्वच गावात उसाची लागवड सुरू झाली आहे. यातही काही लोक हरभरा व राजमा पीक घेऊन नव्या उसाच्या लागवडीचे नियोजन करत आहेत. तालुक्यात तीन साखर कारखाने व चार गूळ पावडर कारखाने आहेत. यामुळे गाळपाची पण चिंता राहणार नसल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढत आहे.
रोपांची लागवड, शेतकऱ्यांचा कल वाढला...
प्रचलित पद्धतीने ऊस लागवड करताना बेण्यांची गरज जास्त लागते. यामुळेच अलीकडे राज्यातील शुगर केन बेल्टमध्ये उसाच्या रोपांची लागवड करण्यावर भर दिला जातो. हीच पद्धत यंदा कळंब तालुक्यातही व्याप्ती वाढविताना दिसत आहे. अनेक शेतकरी प्रमाणित तसेच इतर प्रचलित वाणांच्या रोपांची लागवड करण्यावर शेतकरी भर देत आहेत.
'नॅचरल'चा नवा पॅटर्न...
■ साखर उद्योगाची पंढरी समजल्या जाणाऱ्या रांजणी येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने रोपांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीतील रोपावर शेतकऱ्यांना प्रति रोप पन्नास पैशांचे अनुदान देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या नर्सरीत सध्या १ कोटी २१ लाख रोपांची नोंदणी झाली असून ९३ लाख रोपांचे वितरण झाले आहे. याशिवाय कारखान्याचे अध्यक्ष तथा कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून नॅचरल सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान हा उपक्रम हाती घेत रोपांचा खर्च वाचावा यासाठी एक रुपयात शेतकरी स्वतः च्या शेतात रोप करू शकतील यासाठी शेतकऱ्यांना रोप निर्मिती, बेण्यांची निवड करणे यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे शेतकी विभागाचे शिवप्रसाद येलकर यांनी सांगितले.