पावसाचा दीर्घकाळ खंड ऊसाच्या जिवावर बेतला आहे. ऊस क्षेत्राची संपूर्ण वाढ थांबल्याने ऊस गाळपावर कमालीचा परिणाम होणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऊस क्षेत्रात फार घट होणार नसली तरी उसाची वाढ थांबल्याने गाळप हंगाम १०० दिवसातच गुंडाळेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे.
जुलै महिन्यात पडलेल्या पावसाचा काही अंशी परिणाम व फायदा सर्वच पिकांना झाला. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिना ऊस व इतर पिकांसाठी हानिकारक ठरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कृषी खात्याकडे ऊस क्षेत्र थोडे अधिक नोंदले आहे. राज्यात १४ लाख ३७ हजार हेक्टर इतके नोंदले असले तरी एकच ऊस क्षेत्र एकापेक्षा अधिक साखर कारखान्याला नोंदल्याने प्रत्यक्षात ऊस क्षेत्र कमीच सांगण्यात आले. पावसाचा ३० ते ३५ दिवसांचा खंड उसासाठी फारच हानिकारक ठरत आहे. गेल्या महिना- सव्वा महिन्यापासून अनेक ठिकाणी उसाला पाणीच नाही.
दुष्काळी परिस्थितीत ऊस क्षेत्राचा अंदाज घेत येत्या साखर गाळपाचे नियोजन करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयात साखर कारखान्यांची बैठक झाली. या बैठकीत कारखान्यांनी ऊस क्षेत्रात घट होईल, मात्र ती फार नसेल असे सांगण्यात आले. मात्र उसाची वाढ थांबल्याने एकरी वजनात घट होईल असे गृहीत धरले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडला तरच ऊस उताऱ्याची घसरण थांबेल असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. उसाची वाढ थांबल्याने साखर हंगाम उशिरा सुरू होऊन लवकर पट्टा पडेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे.
- मागील वर्षी अतिवृष्टी व संततधार पावसाने उसाची वाढ झाली नसल्याने ऊस क्षेत्र भरपूर असूनही राज्याचा साखर हंगाम लवकर आटोपला.- सोलापूर जिल्ह्यात तर २०१९-२० मध्ये अवघे ६३ लाख मेट्रिक टन तर मागील २२-२३ वर्षी एक कोटी ८१ लाखांवर गाळप थांबले होते. यावर्षी २०२३-२४ चे गाळप २२१ लाख मेट्रिक टन होईल असे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या आकडेवारीवरून दिसत असले तरी साखर प्रशासनाला जास्तीत जास्त दीड कोटींपर्यंत गाळप होईल असे वाटते.
जिल्हा ऊस क्षेत्र (हे.)कोल्हापूर १,८८,०९० सांगली १,४४,१२७सातारा १,१६,७११पुणे १,४३,४५२सोलापूर २,४०,९५७अहमदनगर १,५२,३३१उस्मानाबाद ७५,०७५औरंगाबाद ३८,५१६जालना ४८,२७५बीड ८२,१५३लातूर ५४,२५५नांदेड ३८,६८३परभणी ३९,६९७