कोल्हापूर साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी पहिल्या उचलीसह मागील हंगामातील २०० रुपयांवर बोलण्यास कोणी तयार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावूनही येत नाहीत, या साखर कारखानदारांना कशाची एवही मस्ती चढली, त्यांना आता सरळ करावेच लागेल, असा इशारा देत यामध्ये आता जिल्हा प्रशासनाने पडू नये, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी कारखानदारांना चांगलेच सुनावले.
मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन दोनशे रुपये व चालू हंगामातील ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला बहुतांशी साखर कारखान्यांचे प्रमुख अधिकारी व अध्यक्ष नसल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना धारेवर धरले.
सोमवारी सायंकाळी पुन्हा बैठकीचे पत्र काढून कारखान्यांना कळविण्याचा निर्णय घेण्यात आला, प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाल मावळे यावेळी उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शांततेने चर्चा करण्याचे आवाहन सुरुवातीलाच केले.
पण, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्याण्णावर बैठकीवरच हरकत घेत कारखान्यांचा एकही जबाबदार पदाधिकारी नाहीत, मग त्यांच्या लिपिकांसोबत चर्चा करायची का? असा सवाल करत आक्रमक झाले.
जनार्दन पाटील म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष येत नाहीत तोपर्यंत हंगाम बंद ठेवा. यावर, पुन्हा बैठक बोलावली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पण, अध्यक्षांना आताच बोलवा, त्याशिवाय इथून हलणार नाही असा पवित्रा सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतला.
एकीकडे दर जाहीर करायचा नाही, आणि दुसऱ्याला बाजूला साखर उतारा मारण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप 'आंदोलन अंकुश'चे धनाजी चुडमुंगे व जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, हा काय पोरखेळ चालवला आहे काय? कारखानदार गांभीर्याने घेणार नाहीत का? एवढी मस्ती त्यांना चढली असेल तर ती उतरण्याचे काम आम्ही करू. पुढच्या बैठकीला ते आले नाहीतर याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी आहे.
चर्चेत श्रीकांत घाटगे, मिलिंद साखरपे आदींनी भाग घेतला. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, अॅड. माणिक शिंदे, स्वाभिमानी, आंदोलन अंकुश, जयशिवराय, भारतीय किसान सभा, रयतसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कारखानदारांना खरकटे खायचे का?
पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याने चालू हंगामासाठी प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर केला आहे. याबाबत त्यांच्या अध्यक्षांना विचारले असता, आम्ही भांड्यात खरकटे शिल्लक ठेवत नसल्याचे सांगितले, मग येथील कारखानदारांना शेतकऱ्यांचे खरकटे खायचे आहे का? असा सवाल शेट्टी यांनी केला.
मागील 'आरएसएफ' वरून धारेवर
आजरा कारखान्याच्या प्रतिनिधीनी २०२२-२३ मधील हंगामातील आरएसएफ वरून कसा दर दिला हे सांगितले. पण, त्यावर हरकत घेत धनाजी चुडमुंगे म्हणाले, बैठकीत २०२३-२४ हंगामातील उर्वरित पैशासाठी असताना दिशाभूल करता कशाला? मागील हंगामाचा हिशेय सांगा असा आग्रह धरला. यावर, मागील हंगामातील लेखापरीक्षण झालेले नसल्याचे साखर सहसंचालकांनी सांगितले. तुम्ही अजून दोन वर्षे लेखापरीक्षण करणार नाही, मग शेतकऱ्यांनी तोपर्यंत वाट बधायची का? असा सवाल चुडमुंगे यांनी केला.
शेट्टींच्या जयघोषाने कार्यालय दुमदुमले
स्वाभिमानीच्या फुटीनंतर दोन्ही गट बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. पण, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक यांनी चर्चेत सहभाग घेणे टाळले. बैठकीनंतर राजू शेट्टी हे आपल्या समर्थकांसह बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्या विजयाच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले.
मुख्यमंत्र्यांनी बोलावले असते तर..
शेतकरी संघटनेसोबत चर्चा करण्यासाठी कारखान्यांच्या अध्यक्षांना वेळ नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी बोलावले असते तर धावत पळत गेले असते. त्यामुळे आता अध्यक्ष येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही, असा पवित्रा सदाशिव कुलकर्णी यांनी घेतल्या.
अधिक वाचा: जुन्नरच्या कॉम्प्युटर इंजिनिअरने लावली बारटोक वांगी अन् करून दाखविली नोकरीपेक्षा शेती भारी