Sugar Factory : साखर कारखान्यांनी आता मळीपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करण्याबाबतचा सल्ला साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखान्यांना दिला असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रेसमड किंवा प्रेसकेक म्हणजेच मळीपासून बायोगॅसची निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे.
दरम्यान, विघटनशील कचरा किंवा जैव पदार्थ जसे की, साखर कारखान्यांमध्ये निर्माण होणारे प्रेसमड, स्पेंट वॉश, शेतातील पाला पाचोळा, याचे जैव विघटन प्रक्रिया केली असता बायोगॅसची निर्मिती होत असते. बायोगॅसचा वापर वीज आणि उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा बायो-मिथेन/बायोसीएनजी उत्पादन करण्यासाठी, शुद्धीकरण करून केला जाऊ शकतो.
प्रेसमड पासून बायोगॅस उत्पादन
प्रेसमड किंवा फिल्टर केक किंवा प्रेस केक हा साखर उद्योगातील ऊस रस शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारा उपपदार्थ आहे. प्रेस मडमध्ये जवळपास ७०-७५% ओलावा आणि २५-३०% शुष्क पदार्थ असतात. प्रेसमडचा पारंपारिक पद्धतीने उपयोग हा खत तयार करण्यासाठी केला जातो किंवा फेकला जातो. परंतु कॉम्प्रेस्ड बायोगॅस साठी फीडस्टॉक म्हणून प्रेसमडचा वापर अनेक दृष्टीने फायदेशीर आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बायोगॅस उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून प्रेसमडचा वापर करुन अतिरिक्त कमाई करण्यात मदत होऊ शकते. प्रेसमड पासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार केल्यास, त्याचा उपयोग साखर कारखान्यांमधील कचरा व्यवस्थापन समस्या सोडवण्यासाठी, शाश्वत उर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी आणि आपल्या जमिनीत सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी होईल.
महाराष्ट्रात २०२३-२४ च्या गळीत हंगाम मध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांनी सुमारे १ हजार ७६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन केले आहे. एका मेट्रिक टन उसाचे गाळप केल्यास सुमारे ४० किलो (४%) प्रेस मड तयार होतो. तर २०२३-२४ च्या गाळप हंगामात महाराष्ट्रात सुमारे ४३ लाख मेट्रिक टन प्रेस मड (१०७४ लाख मे.टन पैकी ४%) तयार झाला आहे.
साखर आयुक्तालयाने मांडलेल्या गणितानुसार, एक टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्यासाठी अंदाजे २५ टन प्रेसमड आवश्यक आहे. याप्रमाणे प्रतिदिन ५ टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पासाठी दररोज सुमारे १४० मेट्रिक टन प्रेसमड आवश्यक आहे. साखर कारखान्यांना किमान ३०० दिवस प्रतिदिनासाठी ५ टनाचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प चालवायचा असेल तर, ४२ हजार ते ४५ हजार मेट्रिक टन प्रेसमड लागेल. म्हणजे ज्या कारखान्याचे गाळप १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे असे कारखाने ५ टन प्रतिदिन क्षमता असलेला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प दहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी चालवू शकतील.
बहुतेक साखर कारखाने कंपोस्टिंगसाठी प्रेसमड वापरतात. या जैवखताच्या विक्रीपासून कारखान्यास अंदाजे १ हजार रूपये टन एवढे पैसे मिळू शकतात. प्रेसमडमध्ये स्पेंट वॉश मिसळून बायो कंपोस्ट तयार केल्यास, या बायो कंपोस्टला साधारण १५०० रु प्रति मेट्रिक टन एवढा दर मिळू शकतो. परंतू प्रेसमड पासून बॉयोगॅस तयार केल्यास, या बायोगॅसला ७० रूपये प्रति किलो पेक्षा जास्त दर मिळू शकतो. आणि प्रेस मडमधून गॅस काढल्यानंतर ६०% बायो कंपोस्ट मिळू शकते आणि या बॉयोकंपोस्टलाही १००० प्रति मेट्रिक टनाप्रमाणे पैसे मिळू शकतात.