महेश जगताप
सोमेश्वरनगर : ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यास सोमवार (दि २५ डिसेंबर) पासून जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार व मुकादम यांनी "कोयता बंद'ची हाक दिली असून, आजपासून ऊसतोडी बंद केल्या आहेत. जोपर्यंत आमची ५० टक्के वाढीची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उसाला कोयता लावणार नाही, असा इशारा ऊसतोडणी कामगारांनी दिला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर ऊस पुरवठ्याअभावी थंडावले आहेत.
ऊस तोडणी वाहतूकदार मुकादम यांचा ऊसतोडणी भाव वाढीसाठी संप सुरू केला आहे. ऊसतोडणी संघटना व साखर संघ यांच्यात दर तीन वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरविले जातात. सन २०२०-२०२३ या तीन वर्ष करार झालेली मुदत संपली आहे, त्यानंतर नवीन करार करण्यासाठी साखर संघासोबत तीन बैठका पण झाल्या आहेत, पहिल्या बैठकीमध्ये ७ टक्के, दुसन्या बैठकीमध्ये २४ टक्के, तिसऱ्या बैठकीमध्ये २७ टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे.
मात्र, ऊसतोडणी वाहतूकदार, मुकादम यांच्या सर्व संघटनांनी त्यांची १०० टक्क्यांच्या मागणीवरून आता ते ५० टक्के भाववाढ झाली पाहिजे या मागणीवर आले आहेत. मजुरांना २३७ रुपयांवरून आता २७३ रुपये एवढी टनाला तोडणी दिली जाते. यामध्ये खूप मोठी तफावत आहे, दुसऱ्या शेजारील राज्यात, पण महाराष्ट्रापेक्षा ऊसतोडणी व वाहतुकीचे दरामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील मजूर दुसऱ्या राज्यात ऊसतोडणी, वाहतुकीसाठी जात आहेत. त्याचा परिणाम साखर कारखान्यावर होण्याची शक्यता आहे.
- ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांच्या सर्व संघटनांनी त्यांची १०० टक्क्यांच्या मागणीवरून आता ते ५० टक्के भाववाढची मागणी.
- ऊसतोडणी मजुरांना २३७ रुपयांवरून आता २७३ रुपये एवढी टनाला तोडणी दिली जाते.
निम्मे कारखाने १० तास बंद
सद्य:स्थितीला कारखान्यांचा ८० टक्के एवढा ऊसपुरवठा कमी झाला आहे. जिल्ह्यातील निम्मे कारखाने २४ तासांपैकी ८ ते १० तास उसाअभावी बंद ठेवावे लागत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असलेल्या साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम संघटना यांच्यात जो संप चालू त्यासाठी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.