ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना शासनाकडून ५९ टक्के दरवाढ मिळावी, या मागणीसाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने ऊसतोड मजुरांचा संप पुकारल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने ही याच मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना गाळप हंगामापूर्वी संपाचा सामना करावा लागणार आहे.
ऊसतोडणी कामगार मुकादम व वाहतूकदार यांना कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या दरात ५० टक्के वाढ करावी, अन्यथा ऊसतोडणी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक, मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी सोमवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना दिला. ते म्हणाले, सध्या ऊसतोड कामगाराला डोकी सेंटरला २७३, गाडी सेंटर व टायर बैलगाडीला ३०४ रुपये प्रतिटन तर किलोमीटरला १४ रुपये टनाला पैसे मिळत आहे. मात्र सध्याच्या महागाईचा आणि मजुरीचा दर पाहता हे पैसे पुरेसे नाहीत. ऊसतोडणी कामगारांच्या मजुरी बाबतच्या कराराला तीन वर्षे पूर्ण होत झाले आहेत. त्यामुळे शासनाने सध्या मिळत असलेल्या तोडणी कामगारांच्या दरात ५० टक्के वाढ करावी, अशीदरात ५० टक्के वाढ करावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.
या आहेत संघटनेच्या मागण्यामुकादम कमिशन व वाहतूकदारांच्या ट्रक, ट्रॅक्टरच्या दारात दुप्पट वाढ करावी, पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे साखर आयुक्त व साखर संघाने करावी, विम्याची रक्कम ५ लाख करावी, कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्याच भागात निवासी आश्रम शाळा सुरु कराव्यात, नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऊसतोडणी कामगार उन्नती प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात यावा, शासनाने कामगारांना घरकुल द्यावे, ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यांच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व विजेची व्यवस्था करण्यात यावी. मुकादम व कामगार यांना शासनाकडून ओळखपत्र देण्यात यावे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळावे. आदी मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अन्यथा संप मागे घेणार नसल्याचा इशारा थोरे यांनी दिला.