Join us

उद्यापासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 8:29 AM

यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यास उद्या बुधवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही कारखान्यांनी तयारी केली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम दबकतच सुरू होणार हे निश्चित आहे.

राज्य शासनाने यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यास उद्या बुधवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही कारखान्यांनी तयारी केली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम दबकतच सुरू होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे यंदा पाऊस कमी झाल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. आठ तास वीज, त्यात पाणी पुढे सरकत नसल्याने पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा ऊस तोडीकडे लागल्या आहेत.

साधारणतः १५ ऑक्टोबरपासून सीमाभागाच्या शेजारी असलेल्या तालुक्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असतो. मात्र, यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आक्रमक आहेत. मागील हंगामातील चारशे रुपये द्या व ७ नोव्हेंबरच्या ऊस परिषदेत या हंगामातील ऊस दराची घोषणा केली जाईल, असे संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एकरकमी तीन हजार रुपये दर जाहीर केला आहे पण, तो संघटनेला मान्य नाही. मागील हंगामातील अगोदर बोला, मगच हंगाम सुरू करा, यावर संघटना ठाम आहे. त्यामुळे हंगामाचा गुंता कोल्हापूर जिल्ह्यात तयार झाला आहे.

संघटनांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने शेतकऱ्यांचेही पाठबळ आहे. पण, यंदा जिल्ह्यात जेमतेम ५४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यात गेल्या दीड महिन्यात एकदाही पाऊस न झाल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. सप्टेंबर महिन्यापासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पूर्वेकडील कारखान्यांची अडचणशिरोळ, हातकणंगले तालुक्यांत स्वाभिमानी संघटनेचा तुलनेत अधिक प्रभाव आहे. त्यामुळे या तालुक्यातील साखर कारखान्यांसमोर हंगाम सुरु करण्याच्या अडचणी आहेत. उर्वरित तालुक्यातील कारखान्यांचा हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे.

जानेवारीनंतर उपसा बंदीचे संकट?धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली, तरी यंदा पाऊस कमी झाल्याने जमिनीत पाणी खोलवर गेले आहे. साधारणतः जानेवारीपासूनच विहिरी कोरड्या पडू लागणार आहेत. गेल्यावर्षी एप्रिल, में महिन्यात उपसा बंदी सुरु केली होती.. यदा जानेवारीपासून हे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीकोल्हापूरराजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना