Join us

उस आंदोलनाला अखेर यश! शेतकऱ्यांना मिळणार १०० रूपये जास्तीचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 8:15 PM

यंदा हमीभावापेक्षा १०० रूपये जास्त दर देण्यात येणार आहे.

कोल्हापूर : मागच्या वर्षांत गाळप झालेल्या उसाचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा आणि यंदाच्या हंगामात वाढून दर द्यावा यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे चक्काजाम आंदोलन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून मागच्या उसासाठी १०० रूपयांचा हफ्ता तर यंदाच्या उसासाठी १०० रूपये दर वाढून देण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी मान्य केलं आहे. यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

काल (ता. २२) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार, शेतकरी, आंदोलक यांच्यामध्ये बैठक झाली. यामध्ये आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर आज कोल्हापुरातील शिरोळ येथे चक्काजाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार आज मुंबई-बंगळूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी चक्काजाम करून रस्ता अडवला होता. चक्का जाम आंदोलनाच्या तब्बल ८ तासानंतर अखेर उस दराच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. 

दरम्यान, मागील हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा दर प्रती टन रुपये ३,०००/- पेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना  रुपये १००/- अतिरिक्त प्रतिटन द्यावे व ज्यांनी रुपये ३,०००/- पेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे त्या साखर कारखान्यांनी रुपये ५०/- प्रतिटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी मा. पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांना दिले आहेत.

तसेच, दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना मा. पालकमंत्री यांनी केले. या आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन आणि मागच्या हंगामासाठी वाढीव उस दर मागणीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊससंपराजकारणराजू शेट्टी