Join us

Sugarcane Factory हा साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार २५ लाख उसाची रोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 8:38 AM

दा क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना २५ लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार असल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले.

कुंडल : यंदा क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना २५ लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार असल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले. क्रांती कारखाना रोपवाटिकेत ऊसरोपे तयार करण्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी टिशूकल्चर रोपांचेही वितरण करण्यात आले.

शरद लाड म्हणाले, ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात ८ ते १० मे. टनाची वाढ होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस रोपांची लागवडीत वाढ झाली आहे. परिसरात एकूण ऊस रोपांच्या लागणीत सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर क्रांती कारखान्याच्या ऊसविकास योजनेतून तयार केलेल्या रोपांचा समावेश असतो.

ते पुढे म्हणाले, पहिल्या गाळप हंगामापासूनच योग्य बियाणे मिळावेत म्हणून आमदार अरुणअण्णा लाड सदैव प्रयत्नात आहेत. कारण त्रुटी असलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतेच शिवाय गाळप हंगामावरही त्याचा परिणाम होऊन राष्ट्रीय संपत्तीचा हास होतो.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि त्या अनुषंगाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही करत असलेला हा छोटासा प्रयत्न, मोठा बदल घडवेल. काही शेतकरी कांडी पद्धतीने उसाची लागण करतात.

तथापी कांडी ऐवजी रोप पद्धतीने लागण केल्यास तुटाळी साधण्याचा खर्च वाचतो, पाण्याची व मजूर खर्चात बचत होते, याशिवाय रोप लागणीमध्ये एकाचवेळी येणारे फुटवे व त्याची समान वाढ यामुळे उत्पादनात वाढ होते.

यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक सुकुमार पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले, जितेंद्र पाटील, सी.एस. गव्हाणे उपस्थित होते.

अधिक वाचा: Sugarcane Harvester Scheme: अनुदानावर ऊस तोडणी यंत्र खरेदी करा बिनधास्त, योजनेची मुदत वाढवली

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीसांगली