अशोक डोंबाळे
सांगली : राजारामबापू साखर कारखान्याने प्रति टन तीन हजार २७५ रुपये जाहीर केला आहे. या दरापेक्षा जादा दराची घोषणा अन्य साखर कारखाने करण्याची शक्यता कमी दिसत आहे.
त्यामुळे २०२४-२५ च्या गळीत हंगामात कारखान्याचा अंतिम दर तीन हजार २७५ पेक्षा जास्त जाणार नसल्याचे संकेत दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी लढ्यायचे तेच शांत असल्यामुळे शेतकरी संघटनांनीही कारखानदारांच्या भूमिकेवर संयमाची भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत पहिली उचल तीन हजार ७०० रुपयांची मागणी केली होती. या मागणीकडे साखर कारखानदारांनी पूर्णता दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे कारखानदार आणि संघटनेची बैठक बोलवण्याची मागणी केली. पण, गळीत हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरी प्रशासनाने बैठकच बोलवली नाही.
बैठकीपूर्वीच राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी प्रतिटन पहिली उचल तीन हजार २०० आणि दिवाळीनंतर ७५ रुपये मिळून ३,२७५ रुपये दराची घोषणा केली. आता इतर कारखाने कसा दर देणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
उर्वरित कारखान्यांचा सावध पवित्रा
१) सांगलीतील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडियानेही प्रतिटन तीन हजार १५० रुपये दराची घोषणा केली. अन्य साखर कारखान्यांनी दराची घोषणा करण्यापूर्वीच गळीत हंगाम सुरू केले आहेत. राजारामबापू कारखान्याने जी दराची घोषणा केली आहे, त्यापेक्षा जास्त अन्य कारखाने दर जाहीर करू शकतील, अशी परिस्थिती दिसत नाही.
२) राजारामबापू कारखान्याकडेच वाटेगाव, साखराळे आणि जत असे चार युनिट आहेत. या कारखान्यांचा साखर उतारा चांगला आहे. तरीही, त्यांनी तीन हजार २७५ रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. उर्वरित सर्व कारखाने सावध पवित्रा घेत आहेत. ऊस उत्पादक शांत असेल, तर आंदोलनाचा उठाव कसा होणार, असा प्रश्न शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपी (२०२३-२४)
कारखाना : एफआरपी (रुपये)
हुतात्मा (वाळवा) ३,१००
राजारामबापू (साखराळे) ३,१००
राजारामबापू (वाटेगाव) ३,१००
राजारामबापू (कारंदवाडी) ३,१००
राजारामबापू (तिपेहळ्ळी, जत) २,९००
सोनहिरा (वांगी) ३,१७५
दत्त इंडिया (सांगली) ३,१५०
विश्वासराव नाईक (चिखली) ३,१००
क्रांती (कुंडल) ३,१००
मोहनराव शिंदे (आरग) ३,०००
दालमिया शुगर (करूंगळी) ३,१००
सद्गुरु श्री श्री (राजेवाडी) २,८५०
उदगिरी शुगर (बामणी) ३,१००
रायगाव शुगर (कडेगाव) ३,०००
श्रीपती शुगर (डफळापूर) ३,०००
यशवंत शुगर (नागेवाडी) ३,०००
एसजीझेड अँड एसजीए शुगर (तुरची) ३,१५०