Sugar Factory FRP Updates : राज्यातील गाळप हंगाम मे महिन्याच्या मध्यातच संपला असून अजूनही बऱ्याच साखर कारखान्यांकडे उसाचा एफआरपी थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या एफआरपी रिपोर्टमधून समोर आली आहे. तर आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.
दरम्यान, मागच्या हंगामात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे उसाच्या आणि परिणामी साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता होती. पण नोव्हेंबरअखेर पडलेल्या अवकाळी पावसाने उसाच्या उत्पादनात वाढ झाली. मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या म्हणजेच २०२३-२४ च्या हंगामात साखरेचे उत्पादन वाढले आहे.
या हंगामात १० कोटी ७६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तर वाहतूक आणि तोडणी खर्च पकडून ३६ हजार ७५८ कोटी रूपये एफआरपी शेतकऱ्यांने देणे गरजेचे होते. पण त्यातील ३६ हजार ५७० कोटी रूपये एफआरपी देण्यात आलेली आहे. त्यामुळे १८८ कोटी रूपयांची एफआरपी कारखान्यांकडे थकीत आहे. एकूण एफआरपी रक्कमेच्या ९९.४९ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे.
यंदा राज्यात २०८ साखर कारखान्यांनी गाळप केले असून त्यातील १८१ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे. तर २७ साखर कारखान्यांकडे १८८ कोटी रूपये थकीत आहेत. राज्यात वारंवार एफआरपीची रक्कम थकवणाऱ्या ११ साखर कारखान्यांवर आयुक्तालयाने कारवाई केली आहे.