पुणे : राज्यातील साखर कारखाने बंद होऊन तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरीसुद्धा अजून अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नसल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या अहवालातून समोर आली आहे. १४ मे रोजी राज्यातील अखेरच्या साखर कारखान्याने आपले गाळप थांबवले आहे. ऊस तुटून साखर कारखान्यात गेल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करणे बंधनकारक असते पण अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत.
दरम्यान, यंदाच्या गाळप हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले असून १ हजार ७५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यासाठी तोडणी आणि वाहतूक खर्चासहित ३५ हजार ९९६ कोटी रूपयांचा एफआरपी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. पण त्यापैकी तोडणी आणि वाहतूक खर्चासहित ३५ हजार ४९२ कोटी रूपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. तर ५०४ कोटी रूपयांची रक्कम कारखान्यांकडे अजूनही बाकी आहे.
एकूण एफआरपीच्या रक्कमेपैकी ९८.६० टक्के रक्कम कारखान्यांकडून जमा झालेली आहे पण राज्यातील २०७ साखर कारखान्यांपैकी ५३ साखर कारखान्यांनी अजून एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. तर १५४ साखर कारखान्यांनी पूर्ण रक्कम शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील ७ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.