Join us

Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:48 PM

ऊस मिळविण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचे पेमेंट अडकविणारे साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत.

सोलापूर : ऊस मिळविण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचे पेमेंट अडकविणारे साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत. अशी चालाखी करणाऱ्या जिल्ह्यातील १० ते १२ कारखान्यांवर कारवाई करण्याचा अहवाल साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांना दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सरत्या गाळप हंगामात ३७ साखर कारखान्यांनी कारखाने सुरू केले होते. पाऊस कमी पडल्याने ऊस क्षेत्र सुरक्षित नसल्याने उसाची ओढाताण होणार असल्याने साखर कारखान्यांनी २७०० रुपये व त्यापेक्षा अधिक दर जाहीर केला.

ऊस मिळविण्यासाठी कारखाने दराच्या स्पर्धेत उतरले. मात्र शेतकऱ्यांना पैसे देताना अडचणी निर्माण झाल्या. उसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयाकडून कारखान्यांना विचारणा होऊ लागली.

त्यावर साखर कारखान्यांनी आम्ही १०० व त्यापेक्षा अधिक टक्के अधिक रक्कम उसापोटी दिल्याचे सहसंचालकांना कळविले. इकडे संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे दिले नसतानाही १०० टक्क्यांपेक्षा अधिक पेमेंट दिल्याचे अहवालात दिसत असल्याने आरआरसी कारवाई टळली जात होती.

नंतरही उसाचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने कारखान्यांची बनवाबनवी उघडकीला आली. गाळप उताऱ्यानुसार कारखान्यांची एफआरपी साधारण २१०० रुपये बसत असेल, मात्र शेतकऱ्यांना जाहीर केल्यानुसार सुरुवातीला २७०० रुपयांनी पैसे दिले. गाळप हंगाम संपताना ऊस घातलेल्यांचे पैसे अद्याप दिले नाहीत.

अहवालात पाच कारखाने थकीतसाखर सहसंचालकांच्या अहवालात सिद्धेश्वर ६९२ लाख, मातोश्री लक्ष्मी शुगर १४ कोटी ५५ लाख, जयहिंद शुगर ७८८ लाख, विठ्ठल रिफायनरी आदिनाथ १०९१ लाख, भीमा सहकारी ९८४ लाख, तर आदिनाथ साखर कारखान्यांकडे ६८ लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांना देय आहे. जिल्ह्यातील इतर सर्वच कारखान्यांनी १०० व १२० टक्क्यांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचे कळविले आहे.

मूळ एफआरपीपेक्षा जाहीर केल्याप्रमाणे दर दिल्याने काही पेमेंट देणे असतानाही गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे पैसे दिल्याचे कारखान्यांच्या अहवालात दिसते. मात्र जिल्ह्यातील असे २० कारखाने होते की त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही नोटिसा बजावल्या. काहींनी एफआरपीनुसार, तर काहींनी जाहीर केल्यानुसार पैसे दिले आहेत. सध्या गोकुळ व मातोश्री लक्ष्मी या कारखान्यांच्या तक्रारी आहेत. - प्रकाश अष्टेकर, प्रादेशिक सहसंचालक, सोलापूर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसोलापूरसरकारराज्य सरकार