Maharashtra Sugar Factory : राज्यातील गाळप हंगाम येणाऱ्या दिवाळीनंतर म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर राज्यात अजूनही पाऊस सुरू राहिला तर गाळप हंगाम सुरू होण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण मागील गाळप हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला आहे. मागच्या म्हणजेच २०२३-२४ या गाळप हंगामात साखर कारखान्यांनी २ हजार ८०४ कोटी रूपयांची रक्कम जास्त अदा केली आहे.
दरम्यान, राज्यात मागच्या हंगामात राज्यात १० कोटी ७६ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. पण यंदा राज्यातील उसाखालील क्षेत्र २ लाख टनांनी कमी झाले आहे. मान्सूनचा पाऊस चांगला असल्याने यंदा साखरेचे उत्पादनही चांगले होण्याची शक्यता आहे. पण शेतकऱ्यांसाठी मागील गाळप हंगाम चांगला ठरला आहे.
केंद्र सरकारने मागच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन ३ हजार १५० रूपये हमीभाव जाहीर केला होता. या हमीभावातून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते. पण अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त रक्कम अदा केली आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीपोटी म्हणजेच तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता दिलेली रक्कम ही ३० हजार १० कोटी एवढी आहे. तर तोडणी आणि वाहतूक खर्चापोटी साखर कारखान्यांनी ९ हजार ५४७ कोटी रूपये दिले आहेत.
मागील हंगामात साखर कारखान्यांनी तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांना २७ हजार २०६ कोटी रूपये देणे गरजेचे होते. पण कारखान्यांनी सुमारे ३० हजार १० कोटी रूपये शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा ११ टक्के जास्त रक्कम अधिकची मिळाली आहे. ही जास्तीची रक्कम देण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने आघाडीवर आहेत.
दरम्यान, मागील हंगामात इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध, साखर निर्यातबंदी आणि दुष्काळ-कमी पावसामुळे घटलेले उसाचे उत्पादन या आव्हानांचा सामना करावा लागला. पण तरीही महाराष्ट्रातील साखर उद्योगाने चांगली कामगिरी केली असून शेतकऱ्यांना अधिक पैसे दिले आहेत.